महाराष्ट्र

करमाळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिला ठार

बीड-अहमदनगर ते करमाळा नरभक्षक बिबट्याचा प्रवास ? या नरभक्षक बिबट्यांनी आष्टी येथे तीन जणांना ठार केलं तसेच कर्जत येथे दोन अशा पाच जणांचा बळी घेतल्यानंतर त्याने करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे करमाळा तालुक्यातील अंजनगाव येथील 26 वर्षीय महिलेवर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तीन पिंजरे लावले असून 40 कर्मचारी त्यास पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

शनिवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील अंजनगाव येथील 26 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे करमाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत बिबट्याने घेतलेला हा दुसरा मानवी बळी आहे.

अंजनगाव येथील जयश्री दयानंद शिंदे ( वय 26 वर्षे ) ही महिला निंबोणीच्या शेतात गेली असता उशिरापर्यंत परत आली नाही म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता धडापासून वेगळे झालेले शीर सापडले, त्यानंतर पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिक शोध घेतला असता शीर नसलेल्या अवस्थेत जयश्री शिंदे यांचा मृतदेह आढळून आला
त्यामुळे करमाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच तालुक्यातील लिंबेवाडी येथील शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्याचेही शीर धडपासून वेगळे झालेल्या अवस्थेत सापडले होते. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. आ.संजय शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची सूचना केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close