आपला जिल्हा

परळीच्या रजिस्ट्री कार्यालयातील अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

जिल्ह्यात आणखी कारवाया अपेक्षित -- अॅड.अजित देशमुख

बीड — परळी येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये होत असलेला अनागोंदी कारभार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याकडे लक्ष घातले. त्यामुळे परळी येथील रजिस्ट्री कार्यालयातील दुय्यम निबंधक पी. डी. दहिवाळ यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. जिल्ह्यात आणखी काही कारवाया याप्रमाणे होतील, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

परळी येथील शंभर कोटींच्या आसपासचा मुद्रांक घोटाळा, त्याचप्रमाणे बाजार मूल्य जास्त असताना कमी दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार, यासह अन्य गंभीर प्रकाराला दुय्यम निबंधक कार्यालय जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. परळी येथील कार्यकर्ते अँड. परमेश्‍वर गित्ते यांनी देखील या संदर्भात तक्रार केली होती. जन आंदोलनाने ही या तक्रारीत लक्ष घातले होते.

त्यामुळे परळी येथील दुय्यम निबंधक यांची बदली तडका फडकी धारूर येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी धारूर येथील दुय्यम निबंधक पी. डी. पाटील यांना पाठवले आहे. दोघांनाही आज दुपारी मध्यानानंतर दोन्ही ठिकाणावरून पदमुक्त करण्यात आले असून नवीन पदभार एकमेकांनी एकमेकांना ताबडतोब द्यावा, असे आदेशही बजावण्यात आले आहे.

जिल्ह्यात बोगस अकृषी परवाने जोडून, अनेक नियम डावलून होत असलेला गैर कारभार हा रजिस्ट्री ऑफिसमधील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत आहे. खरं पाहिलं तर या कार्यालयातील अधिकाऱ्यांना यापूर्वीही निवेदने देऊन घोटाळे समोर मांडले होते. मात्र पैशाच्या मागे पडलेले अधिकारी याकडे लक्ष देत नव्हते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यामुळेच आता सुधारणा होतील. मात्र काही अधिकारी निलंबित होऊन आणि काहींना जेलमध्ये घालूनच ही यंत्रणा सुधारेल.

यामुळे जिल्हाभरातील दुय्यम निबंधक कार्यालयात चालू असलेली मग्रुरी बंद होण्यास आता मदत होईल. डोळे झाकून चाललेला कारभार गेल्या काही दिवसांपासून जन आंदोलन सातत्याने पुढे आणत आहे. तरीही येथील मग्रूर अधिकारी सुधारण्याचे नाव घेत नव्हते. आता मात्र त्यांची पाचावर धारण बसली आहे. दरम्यान याशिवाय आणखी काही बड्या अधिकार्‍यांवर देखील कारवाई होईल. तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close