आपला जिल्हा

बिबट्याच्या हल्ल्यात मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने १५ लाख रुपयांची मदत जाहीर

आष्टी तालुक्यात वावरणाऱ्या बिबट्याला विशेष पथके नेमून तातडीने जेरबंद करा – धनंजय मुंडेंचे विभागीय वनाधिकाऱ्यांना निर्देश

बीड / आष्टी  —–  बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सुर्डी आणि परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी विशेष पथके नेमावीत व या भागात नागरिकांमध्ये पसरलेली भीती व दहशत तातडीने संपवावी असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांना दिले आहेत.

आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गर्जे हे मंगळवारी सायंकाळी शेतीला पाणी द्यायला गेले असता बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्युमुखी पडले होते. या घटनेबद्दल ना. मुंडे यांनी दुःख व्यक्त केले असून, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेनुसार मयत गर्जे यांच्या कुटुंबियांना रोख पाच लाख रुपये व त्यांच्या पाल्यांच्या नावे मुदत ठेव (एफडी) दहा लाख असे एकूण १५ लाख रुपये देण्याचेही धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.

ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या परिसरातील बिबट्या जेरबंद होऊन त्याची दहशत लवकरच संपवण्यात येईल, याबाबत वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. परंतु या भागातील शेतकरी बांधवांनी विशेषतः रात्रीच्या वेळी काळजी घ्यावी, स्वत: व आपल्या जनावरांना निर्मनुष्य ठिकाणी असल्यास सुरक्षित स्थळी ठेवावे असे आवाहनही केले आहे.

आष्टी तालुक्यात तसेच बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे अनेक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यातील अफवांमुळे वन विभागाची बऱ्याचदा दिशाभूल होत आहे, तसेच ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार होत आहे, त्यामुळे या विषयीच्या अफवा न पसरवता वन विभागास सहकार्य करावे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close