कृषीवार्ता

अतिवृष्टीत नेत्यांच पर्यटन स्थळ बनलेल्या बीडच्या शेतकऱ्यांच्या हातावर ठाकरेंनी दिलं नरोटं ; 45 हजार शेतकऱ्यांनाच लाभ

बीड– सलग दुसऱ्या वर्षी बीडच्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. यावेळी जिल्ह्यात स्वतःला दिग्गज म्हणवणाऱ्या नेते, मंत्री विरोधी पक्षनेते यांनी जिल्ह्याला पर्यटन स्थळ बनवले मगरीचे अश्रू ही ढाळले. महा विकास आघाडी सरकारने देखील आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं सांगत पाठीवरून हात फिरवला पण प्रत्यक्षात तेवढ्याच जोरात शेतकऱ्यांच्या पाठीत धोपाटीत घालण्याचं काम केलं. जिल्हाधिकारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं ऐकत नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. जिल्ह्यातील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत फक्त 45 हजार शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली हे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील व विरोधी पक्षातील नेत्यांचं सपशेल अपयश आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी महसूल यंत्रणेला दिलेल्या आदेशानुसार कमीतकमी शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल याकडे लक्ष दिले गेले

गेल्या वर्षी देखील अतिवृष्टीने शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान केलं होतं. त्यावेळी सत्तेची अनिश्चितता असल्यामुळे सरकारने कांहीच मदत दिली नाही. प्रशासनाकडून नुकसानीचे फोटो पाठवा अर्ज पाठवा असे सांगत वेळ निभावून नेली. नवीन सरकारच्या आनंदात शेतकरी आपलं दुःख विसरून गेला पण आता शेतकऱ्यांमध्ये सध्या दिलेल्या तुटपुंजी मदतीमुळे नाराजीचा सूर उमटत आहे

. पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं ते ऐकत नसल्याचं आज पर्यंत बोललं जात होतं ते आज शेतकऱ्यांना केलेल्या मदती वरून सिद्ध झालं. जिल्हाधिकाऱ्यांच काम सरकारच्या हिताच असलं तरी शेतकऱ्यांना मारक ठरलं. त्यामुळेच मराठवाड्याची आकडेवारी पाहिली तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान होऊन देखील सर्वात कमी मदत बीड जिल्ह्याला मिळाली आहे. अतिवृष्टी झाली त्यावेळी स्वतःला राज्याच्या राजकारणात दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांनी बीड जिल्ह्याला पर्यटन स्थळ बनवले. अतिवृष्टीने निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांचे कसे हितचिंतक आहोत हे दाखवण्याची चढाओढ लागली. अंगाला एरवी धूळ लागू न देणारी नेतेमंडळी चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचली पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.
शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी हेक्टरी 10 हजार तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी 25 हजार रुपयांची घोषणा केली. कृषी विभागाने पंचनामे करुन अहवाल दिल्यानंतर जिल्ह्यातील 45 हजार 684 शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, जिल्ह्याला 153 कोटी 37 लाख 69 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला होता.मात्र, यापैकी केवळ 14 कोटी 55 लाख 86 हजार रुपये इतकेच अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.मदत वाटपाची टक्केवारी केवळ 9.49 टक्केच आहे. उर्वरित शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्याच्या तुलनेत हा टक्का सर्वांत कमी असून शंभर टक्के अनुदान वितरित करुन नांदेड जिल्हा अव्वलस्थानी आहे‌.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close