कृषीवार्ता

लॉकडाऊन, अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मारलं तर वीज मंडळाने शेतकऱ्यांच सरणच रचल

बीड — लाॅकडाउन च्या काळामध्ये देशाला शेतीने जगवले असले तरी त्याकाळात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यातून कसाबसा सावरलेला शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त केला. मरणासन्न अवस्थेत गेलेल्या शेतकऱ्यांना ऐन पिकाला पाणी देण्याच्या मोसमामध्ये गवारी येथील 220 केव्ही उपकेंद्रातील एक पावर ट्रांसफार्मर जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे सरणच रचण्याचा प्रकार महापारेषण ने केला आहे. लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे लक्ष देतील काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
गवारी येथे 220 केव्ही उपकेंद्र सुरू झाल्यानंतर चौसाळा परिसराला वीज पुरवठा व्यवस्थित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पूर्वी बीड, पाटोदा येथून चौसाळा परिसरात असलेल्या 33 केव्ही सब स्टेशन ला वीज पुरवठा होत होता. त्यावेळी अतिरिक्त भार असल्याने कमी दाबाने वीज पुरवठा होत होता. सुरळीत वीज पुरवठा ही बाब शब्दकोशातच राहिली नव्हती. पूर्वीचीच अवस्था आज देखील होत असल्याचे चित्र चौसाळा परिसरात पाहावयास मिळत आहे. नियमित खंडित वीज पुरवठा गवारी सब स्टेशन कडून तर होत आहेच आहे शिवाय कमी दाबाने देखील वीज पुरवठा केला जातो. विद्युत वाहिनी तूटण्याचे प्रमाण नेहमीचेच आहे. थोडासा देखील वादळवारा चौसाळाकरांसाठी नशिबी अंधार घेऊन येतो. गवारी उपकेंद्राचा शेतकऱ्यांना फायदा काय झाला हा प्रश्न शेतकऱ्यांकडून नेहमीच विचारला जात आहे.चूक जरी गवारी उपकेंद्राची असेल तरी लोकांच्या शिव्या चे धनी मात्र 33 के व्ही सब स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना व्हावे लागते. या सर्व प्रकारामुळे कित्येक वेळा लोकांच्या रोषाला या कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. लाॅक डाऊन पूर्वी गवारी उपकेंद्रातील पावर ट्रांसफार्मर कमकुवत झाला होता. तो शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याच्या ऐन मोसमात जळून गेला. किमान हा पावर ट्रांसफार्मर पूर्ववत सुरू होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे अधिकाऱ्यांना यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते देखील उपलब्ध होत नाहीत. परिणामी अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त केलेला असताना त्यात गवारी उपकेंद्रातील अधिकार्‍यामुळे महापारेषण अधिकार्‍यामुळे अधिक भर पडली आहे. पाटोदा येथून पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी अत्यंत कमी दाबाने व खंडित स्वरूपाचा वीज पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युत पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना पुरता उध्वस्त करणाऱ्या या महापारेषणच्या कारभाराविरोधात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close