आपला जिल्हा

चौसाळा परिसराला अखंडित वीज पुरवठा कधी सुरू होणार ? सिंगल फेज ट्रांसफार्मर कधी मिळणार?

बीड — गवारी येथील 220 केव्ही उपकेंद्रातील एक पावर ट्रांसफार्मर जळाल्यामुळे चौसाळा परिसरात असलेल्या तीन 33 केव्ही सबस्टेशन चा वीज पुरवठा खंडित झाला आहे.पाटोदा येथील उपकेंद्रातून सध्या विजपुरवठा होत असला तरी वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे तीन उपकेंद्रातर्गत असलेल्या जवळपास पंधरा ते वीस गावांना अंधाराचा सामना करावा लागत आहे त्यामुळे पाणी प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे.
गवारी येथे 220 केव्ही उपकेंद्रातील एक पावर ट्रांसफार्मर जळाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या कालावधीत लोकांना रात्र अंधारात काढावी लागली. शेतीला होणारा वीज पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे शेती व्यवसाय देखील धोक्यात आला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेवटी पाटोदा येथील 220 केव्ही उपकेंद्रातून चौसाळा परिसरात असलेल्या तीन 33 केव्ही सब स्टेशन ना वीज पुरवठा सुरू करण्यात आला. यामध्ये चौसाळा रुइगव्हाण खडकी यांचा समावेश आहे. पाटोदा उपकेंद्रावर पूर्वीचा असलेला लोड व यात आणखी यातीन 33 केव्ही उपकेंद्राच्या लोडची भर पडल्यामुळे चौसाळा परिसराला होणारा वीजपुरवठा जनतेची समजूत काढण्यापूरताच होत आहे. 24 तासातील किती तास विज टिकेल हे सांगणे अवघड होऊन बसले आहे . तीन 33 केव्ही सब स्टेशन अंतर्गत जवळपास वीस गाव सध्या रामभरोसे आहेत. गवारी येथून होणारा वीजपुरवठा तेथे काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नेहमीच असा तसाच राहिलेला आहे. येथून वीजपुरवठा खंडित झाला तर तब्बल 2 — 2 तास खंडीत केला जातो. याची जबाबदारी महावितरण वर ढकलून येथील अधिकारी मोकळे होत असल्याचे चित्र नियमित पहावयास मिळत आहे. त्यांच्या या मनमानीला आळा घालण्यात यावा अशी मागणीदेखील जनतेतून होत आहे.

अडचणीत आणखी वाढ
चौसाळा ,हिंगणी बुजुर्ग येथे असलेले सिंगल फेज ट्रांसफार्मर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात जळाले त्याला दोन महिन्याचा कालावधी उलटून जात आहे. जळालेले सिंगल फेज ट्रांसफार्मर महावितरणकडे जमा केले मात्र या ट्रांसफार्मर ला आवश्यक असणारे तेल उपलब्ध होत नसल्यामुळे जर थ्री फेज आली तर घंटा दोन घंटे कशी तरी थोडीफार वीज मिळते. शेतीला होणारा वीज पुरवठा बहुतांश वेळी रात्रीत असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी लोकांना पिठाच्या गिरणीबाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे. पाणीप्रश्न देखील गावांचा गंभीर बनत चालला आहे. अन्नपाणी दोन्ही ची समस्या त्यात दिवाळीचा सण अंधारातच उपाशीपोटी साजरा करावा लागत आहे. सिंगल फेज ट्रांसफार्मर संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आम्ही त्या प्रयत्नात आहोत लवकरच मिळून जातील असं सांगत वेळ निभावून नेण्याचा व जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकूणच या भागातील लोकांची दिवाळी अंधारात साजरी करावी लागली. सरकार मोठमोठे दावे करत असले तरी बीडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कार्य कौशलतेने सरकारच्या तोंडात चपराक मारली आहे. यात जनता मात्र भरडून निघत आहे. या भागातील सिंगल फेज ट्रांसफार्मर बसवण्यात यावे व वीज पुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close