महाराष्ट्र

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरासह सर्व प्रार्थना स्थळ भक्तांसाठी खुली होणार

मुंबई — कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे पाहून टाळेबंदीमुळे गेल्या सात महिन्यांहून अधिक काळ कुलूपबंद असलेली राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे पाडव्यापासून उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या निर्णयाची घोषणा करतानाच मंदिरे खुली करण्याचा हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं’ ची इच्छा आहे असे समजा, असे ते म्हणाले. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील भक्तांना देवालयाची पायरी चढता येणार असून मंदिरांवर अवलंबून असलेल्या छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी परवानगी देताना काही मार्गदर्शक सूचनाही केल्या असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं बंद करण्यात आली होती. त्यानंतर १ जूनपासून देशात अनलॉकिंगची व राज्यात मिशन बिगीन अगेनची प्रक्रिया सुरू करून एकेक निर्बंध शिथिल करण्यात येत होते. अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. संसर्गाच्या धोक्यामुळे राज्य सरकारने प्रार्थनास्थळं उघडण्याची अनुमती देण्याबाबत सावध भूमिका घेतली होती.

अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरेही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. भाजपसह काही पक्ष व संघटनांनी यासाठी आंदोलनही केले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहून निशाणा साधला होता. कोश्यारी यांच्या पत्राला उद्धव ठाकरे यांनीही ‘ठाकरी भाषेत’ जसाश तसे उत्तर दिल्याने मुख्यमंत्री विरूद्ध राज्यपाल असा वाद चिघळला होता. परंतु, कोणत्याही स्थितीत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याशिवाय प्रार्थनास्थळं उघडण्यास परवानगी देणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री व राज्य सरकारने घेतली होती.

गेल्या काही दिवसांत करोनाचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर पोहचले असून दैनंदिन रुग्णांची वाढ नियंत्रणात आली आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या कमी होऊन ८४ हजारांच्या घरात आली आहे. कोरोनाला अटकाव करण्यात प्रशासनाला येत असलेल्या यशामुळे महाविकास आघाडी सरकारने सोमवारी, पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली.

कोरोनाचा नरकासूर थंड पडला, पण बेसावध राहू नकाः

प्रार्थनास्थळं सुरू करण्याची घोषणा करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षस हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.

शिस्तीचे पालन करा, गर्दी टाळाः महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली आहे. कोरोनाकाळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद होती. पण डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद मिळतीलः

मंदिरे खुली करण्याचा हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा आहे असे समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close