क्राईम

25 लाखाची बॅग लंपास करणाऱे चोरटे 24 तासात जेरबंद

परळी — औरंगाबाद येथील प्लॅस्टिकचे होलसेल व्यापारी संजय गंगवाल परळी मध्ये गुरुवारी वसूलीसाठी आले . त्यावेळी त्यांच्या लॉक केलेल्या कारमधून 25 लाखांची बॅग चोरट्यांनी पळवली होती मात्र परळी शहर पोलिसांनी 24 तासात या चोरीचा छडा लावत आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले. औरंगाबाद येथील चोरट्यांनी गंगवाल यांच्यावर तीन दिवस पाळत ठेवली होती. त्यानंतर परळी शहरात त्यांच्या लॉक केलेल्या गाडीतील 25 लाख असलेली बॅग लांबवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
व्यापारी संजय गंगवाल यांनी याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपण येथील संजय प्लॅस्टिक होलसेल दुकान चालवत असून मराठवाड्यात प्लास्टिकचा होलसेल पुरवठा करतो. गुरुवारी वसूली केल्यानंतर आपली गाडी परळीतील मोंढा भागात उभी केली होती. आपण एका व्यापाऱ्याला भेटायला गेलो होतो. तर वाहनचालक हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेला होता. त्यावेळी चोरट्यांनी आपली लॉक केलेली गाडी उघडून त्यातील 25 लाखांची बॅग लांबवल्याचे गंगवाल यांनी तक्रारीत नमूद केले होते. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात करण्यात आली.
गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत दोन आरोपींना चोरीसाठी वापरलेली कार व मुद्देमालासह अटक करण्यात परळी शहर डी.बी.ला यश आले आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे पोलीस जमादार भास्कर केंद्रे, सुंदर केंद्रे , शंकर बुड्डे, गोविंद भताने, हनूमान मुंडे यांनी तब्बल 800 किलोमीटर पाठलाग करुन वैजापूर परिसरातून दोघांना अटक करून चोरीसाठी वापरलेली कार व रोख रक्कम मुद्देमालासह जप्त केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close