आपला जिल्हा

जिल्हा बँक वैद्यनाथ कारखान्याला पंचवीस कोटी रुपये कर्ज देण्याच्या तयारीत

  •  बँकेने आपली औकात तपासावी — अँड. अजित देशमुख

बीड  — दि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ली. बीड ही अगोदरच अडचणीत आहे. त्यातच अडचणीत आणि कर्जबाजारी असलेल्या वैद्यनाथ कारखान्याला जिल्हा बँक पंचवीस कोटी रुपये कर्ज द्यायला निघाली आहे. ही बाब चुकीची असून याबाबत आपण संबंधित प्रशासनाकडे तीव्र नाराजी नोंदवली असल्याची माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

बँकेला ठेवीदारांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात द्यायचे बाकी आहे. त्याच प्रमाणे अनेक सहकारी संस्थांच्या ठेवी या बँकेत अडकून पडलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जवळपास सव्वाशे कोटी रुपयांच्या ठेवी जिल्हा बँकेत अडकून पडल्या असून गेल्या कित्येक वर्षापासून दिल्या जात नाहीत. सर्व ठेवी देण्याची ताकद जिल्हा बँकेत नाही. मात्र गळालेली बँक अडचणीतल्या कारखान्याला कर्ज देण्यासाठी उत्सुक का आहे ? हा प्रश्न याठिकाणी निर्माण होत आहे.

वैद्यनाथ कारखान्याकडे यापूर्वीचे अनेक अनेक बँकांचे जवळपास तिनशे छप्पन्न कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. एवढेच नाही तर हा कारखाना तब्बल दोनशे एकवीस कोटी रुपयांनी तोट्यात आहे. असे असतानाही याचं कारखान्याला कर्ज देण्याचा अट्टाहास जिल्हा बँक का करत आहे ? हे समजत नाही.

आमच्या तक्रारीनंतर विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी एक पत्र काढून जिल्हा बँकेने पूर्व परवानगी शिवाय कर्ज वाटप करू नये, असे आदेश वैद्यनाथ कारखाना संदर्भात जिल्हा बँकेला बजावले आहे. मात्र येत्या काही दिवसात हे पत्र बदलून कर्ज द्यायला संमती देण्याची तयारी देखील या कार्यालया कडून होत असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे सरकारने थकहमी दिली असली तरी देखील बँकेची परिस्थिती चांगली नाही. कारखान्याची परिस्थिती देखील चांगली नाही. मध्यंतरी काही तरी घडामोडी घडल्या. त्या कारणावरून शासन देखील कर्ज देण्याचा सल्ला पुन्हा देऊ शकते. अशी देखील चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. त्यामुळे शासन हे साखर सम्राटांच्या बाजूने असल्याचे कायम पहावयास मिळत असल्याचा आरोप देखील अँड. देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, या संदर्भात जन आंदोलनाने बँकेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवाजीराव बडे यांचे बरोबर संपर्क साधून अशा प्रकारचे कृत्य होऊ नये, सरकारने काही जरी सांगितले तरी बँकेने आपली परिस्थिती तपासून आपण किती खोल पाण्यात आहोत, हे पहावे, आणि कर्ज नाकारावे, अशी भूमिका मांडली आहे. जर कर्ज दिले तर पुन्हा चौकशीचा ससेमिरा बँकेच्या मागे लागेल, असा इशाराही अँड. देशमुख यांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close