महाराष्ट्र

विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक अवैध ठरवण्याची गोपीचंद पडळकर यांची मागणी

मुंबई — विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक अवैध ठरविण्यात यावी अशी मागणी करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत

शिवसेनेच्या नेत्या नीलम गो-हे यांची या निवडणुकीत उपसभापतीपदावर निवड झाली आहे.
राज्य विधिमंडळाच्या सर्व नियमांना डावलून विधानपरिषदेचा उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये उपसभापती निवडणुकीबाबत प्रारंभ झाला होता. त्यानंतर कामकाज सल्लागार समितीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोरोना चाचणी करुनच सदस्यांना सभागृहात प्रवेश दिला जाईल. याबरोबरच अन्यही काही नियमही जारी केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी याचिकाकर्ते गोपीचंद पडळकर कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आला.
दरम्यान ७ स्प्टेंबरला अध्यक्षांनी निवडणूक ८ सप्टेंबरला जाहीर केली आणि त्यात शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांची नियुक्ती झाली. मात्र या सर्व अधिवेशन प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केले असून नीलम गो-हे यांची नियुक्ती अवैध असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.विधीमंडळाचे अनेक सदस्य या चाचणीत कोरोनाबाधित आढळले होते, त्यामुळे त्यांना या निवडणुकीपासून वंचित राहावे लागले, असा दावाही करण्यात आला आहे.

निवडणूक मतदानासाठी ऑनलाईन व्यवस्था केली नव्हती आणि निवडणुकीत सहभागी व्हायचे आहे, त्यामुळे ती तूर्तास तहकूब करा ही काही सदस्यांची मागणीही मान्य केली गेली नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. यावर बाजू मांडण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टाकडे वेळ मागितला. न्यायालयाने ही विनंती मान्य करत ३ डिसेंबर रोजी यावर सुनावणी निश्चित केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close