महाराष्ट्र

भुतेकरांचा पिंपळनेर पॅटर्न राज्यात ठरतोय आदर्श; एस पीं च्या मदतीने दिली अर्थ चक्राला गती

जिल्ह्यात देखील टप्प्या टप्याने अंमलबजावणी सूरु

बीड — कोरोना संकट काळामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली आहे बेरोजगारी वाढण्याबरोबरच विकास काम ठप्प पडली आहेत.अशा स्थितीत पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भुतेकर यांनी अर्थ सैनिकांना ( दारू, हातभट्टी) बळ देत मटका जुगार यासारख्या धंद्यांना चालना देतानाच बेरोजगारी नष्ट करणारा प्रयत्न, वाळूच्या माध्यमातून विकास कामांना गती देणारा व पैसा असणाऱ्यांना ब्रह्मानंदाचा ( नशेत) अनुभव देणारा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेला पॅटर्न राज्यात आदर्श ठरला आहे लवकरच तो जिल्ह्यात लागू करावा अशी मागणी आता इतर तालुक्यांमधून सुद्धा केली जात आहे.
कोरोना संकट काळामुळे अख्या राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.अशा काळात सरकारकडून योजलेले उपाय अर्थकारणाला पाहिजे त्या प्रमाणात चालना देऊ शकले नाहीत, असे असताना पिंपळनेर मध्ये मात्र अर्थ चक्राला गती देण्याचे काम भूतेकर नावाच्या प्रयोगशिल पोलिस अधिकाऱ्याने सहज करून दाखवले आहे.आता राज्यभर या पिंपळनेर पॅटर्नचे कौतुक केले जात आहे. बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे याठिकाणी रोजगाराचे साधन अत्यंत तोडकी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षापासून मद्य निर्मिती केली जाते. त्याच धर्तीवर पिंपळनेर परिसरात स्पिरिट, सडक्या गुळाच्या माध्यमातून मद्य निर्मिती प्रकल्प प्रत्येक ठिकाणी उभे केले गेले आहेत. या मद्याची विपणन व्यवस्था देखील अगदी चोख करण्यात आली आहे फोन कॉल केला की घरपोच बिसलेरी सिगारेट गुटका सोबतीला चकणा व विविध नामवंत कंपन्यांचा ब्रँड चे स्टिकर लावलेली (बनावट ) दारू मिळते. प्रत्येक धाब्यावर देखील याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गुंजाळा , खुंट्रस, कुकडगाव या भागातून सिंदफणे च्या वाळूचा उपसा करून ती इतर भागातील विकास कामांसाठी या भागातून पाठवली जात आहे. परिणामी रोज लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून केली जात आहे. वाळूच्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून होत असल्यामुळे या रस्त्यावरून चालताना आपण चंद्रावरून तर चाललो आहोत असा फील आल्याशिवाय राहत नाही! लवकरच चंद्रावरून चालण्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आकर्षित करून घेत पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचा मानस दूरदृष्टी असलेल्या भुतेकर व राजा रामास्वामी यांचा आहे.
प्रत्येक माणसामध्ये सत्यतेचा व प्रामाणिकपणाचा संस्कार घडावा यासाठी जागोजाग जुगार अड्डे सुरू करण्यात आले आहेत. मटक्या सारख्या धंद्यात एका साध्या चिठ्ठीवर कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. हे पाहून रामा स्वामींच्या स्वप्नातलं रामराज्य पुन्हा या भागात लवकरच अवतरल्या शिवाय राहणार नाही. जुगाराच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती कार्यमग्न राहत असल्यामुळे नसते उपद्व्याप करण्याचा विचार त्याच्या डोक्यात कधी येतच नाही. तसेच मदिरालय, धाबे, जुगार अड्डे येथून बाहेर पडलेली प्रत्येक व्यक्ती ही नामस्मरण करत घरापर्यंत जाते. घरातही नंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरु होतो आजूबाजूच्या लोकांची करमणूकही मोठ्या प्रमाणात होते. कायदा व सुव्यवस्था राबवण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करत असते. मात्र या परिसरामध्ये ‘रामा ‘राज्याच्या संकल्पनेमुळे हे काम आता मटका जुगार दारू हे व्यवसाय करणारे शांतता कायम ठेवण्याचे काम आतापासूनच करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पोलीस यंत्रणेची आवश्यकता न पडल्यामुळे शासनाचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होणारे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत. शिवाय या भागामध्ये हे सामाजिक काम ज्या लोकांना पाहावत नाही अशा लोकांना कायमचं या भागातून दूर सारण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. एकंदरीतच राजारामा स्वामींच्या व भुतेकर यांनी राबवलेला हा आदर्श पॅटर्न जिल्ह्यात लवकरच लागू करणार असल्याची मनीषा त्यांच्या एकंदर कामकाजाच्या पद्धतीवरून व्यक्त होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातला कामगार जिल्ह्यातच राहिलेला दिसेल. ज्वारी ऊस यासारख्या कच्च्या मालापासून मद्य निर्मिती करून संपूर्ण राज्यात नव्हेतर देश-विदेशात निर्यात करण्याच देखील स्वप्न लवकरच अवतरलेलं ‌ आपल्याला दिसणार आहे.हाच आदर्श पॅटर्न आता महाविकास आघाडीचा ठाकरे सरकारने संपूर्ण राज्यात लागू करावा व पुन्हा
” रामा ” राजाचे राज्य या महाराष्ट्रदेशी साकार व्हावे अशी मागणी आता जनतेतून केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close