आपला जिल्हा

लोकसभा निवडणुक खर्चातील सव्वा आठ कोटींची होणारी लूट वाचली ; तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह चौदा अधिकारी दोषी

          • खर्च आला अर्ध्यावर- अँड. अजित देशमुख

बीड — लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात वारेमाप खर्च झाला. पैशाची उधळपट्टी करताना निवडणूक खर्चाला ऑडीट नसतं, असं सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना अँड. अजित देशमुख यांच्या तक्रारीमुळे जबरदस्त तडाखा बसला. निवडणूक खर्चात होणारी सव्वा आठ कोटींची लूट वाचली तर दुसरीकडे तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्यासह तब्बल चौदा क्लास वन अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. नऊ वेगवेगळ्या मुद्यात सोळा कोटी त्रेपन्न लाख रुपये खर्च दाखवण्यात आला होता, त्यातला आठ कोटी अठरा लाख रुपये खर्च वाचला असून आता फक्त आठ कोटी नऊ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. यासर्व प्रकारामुळे जिल्हा बदनाम होत चालला असून आपण हा घोटाळा आणखी पुढे नेणार असल्याचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हंटले आहे.

प्रत्येक मुद्यात अनेक मुद्दे समाविष्ट असलेल्या बारा मुद्यांवर आधारित ही चौकशी झाली. यात पाच सदस्य असलेल्या चौकशी समितीने दुसऱ्या एका तक्रारीत क्लीन चिट दिली होती. तर पुन्हा नियुक्त केलेल्या सहा सदस्य असलेल्या समितीने अधिकाऱ्यांना दोषी धरले.

लोकसभा निवडणुकीत संबंधीत कामाच्या कंत्राटदार यांनी बिल दाखल करून सादर केलेली मागणी रक्कम, त्यापुढे कंसात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेली शिफारस आणि तक्रारींमुळे जी रक्कम वाचली ती रक्कम अशी मुद्दा निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

) वेब कास्टिंग २,२०,१३,८४४/- ( ४०,०३,५००/-) वाचले १,८०,१०,३४४
२) जी.पी.एस. ४७,९७,१३५/- ( २८,७८,२८६/- ) वाचले १९,१८,८४९/-
३) मंडप, फर्निचर, लाईट ६,६०,३०,२६९/- ( ३,१५,१८,६५९/- ) वाचले ३,४५,११,६१०/-
४) व्हिडीओ कॅमेरा १,९३,५४,६८०/- ( ७२,५७,६९४/-) वाचले १,२०,९६,९८६/-
५) चहा, नाष्टा, भोजन २,००,७३,९३९/- ( ९२,६१,७४९/- ) वाचले १,०८,१२,१९०/- )
६) संगणक, प्रिंटर, एल. सी. डी., डिश टीव्ही, सीसीटीव्ही १,६१,५९,००९/- ( १,३३,६५,६७७/- ) वाचले २७,९३,३३१/-
७) खाजगी वाहन पुरवठा ६८,१३,०००/- ( ६४,६०,४००/- ) वाचले ३,५२,६००/-
८) साहित्य, स्टेशनरी ४९, ५५,७१०/- ( पूर्ण रक्कम देणे )
९) हमाल, मजूर पुरवठा ५१,१८,२००/- ( ३८,०४, ३७०/- ) वाचले १३,१३,८३०/-

याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत वरील नऊ आणि त्या अंतर्गत मुद्यांवर १६,५३,१५,७६५/ रुपये खर्च दाखवण्यात आला होता. त्यातील केवळ ८,०९,७५,८८९/- मान्य करण्यात आला असून अँड. अजित देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सरकारचे तब्बल ८,१८,०९,७४०/- रुपये वाचले आहेत. आणखी काही खर्चाचे मुद्दे तपासणे बाकी असल्याचे देशमुख यांनी म्हंटले आहे.

निवडणूक काळात हात धुऊन घेणाऱ्या अधिकारी, संस्था, दुकाने आणि दलालांना ही मोठी चपराक आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्यासह चौदा अधिकारी यात दोषी धरण्यात आले आहेत.

दोषी अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी पांडे यांचेसह उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण कुमार धरमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तसेच शोभा ठाकूर ( माजलगाव ) प्रभोदय मुळे ( बीड ) नम्रता चाटे ( पाटोदा ) शोभा जाधव ( अंबाजोगाई ) गणेश महाडिक ( परळी वैजीनाथ ) हे उपविभागीय अधिकारी देखील जबाबदार धरण्यात आले आहेत. याशिवाय संगीता चव्हाण ( गेवराई ) प्रतिभा गोरे ( माजलगाव) अविनाश शिंगटे ( बीड ) हिरामण झिरवाळ ( आष्टी ) मेंडके ( केज ) बिपीन पाटील ( परळी ) या सहा तहसीलदारांना ही जबाबदार धरण्यात आले आहे.

चौकशी समितीने यात जेवढा वेळ दिला त्यापेक्षा जास्त वेळ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला. चौकशी समितीसह राहुल रेखावार यांच्या सखोल अभ्यासामुळे हे शक्य झालं. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही या घोटाळ्याच्या चौकशीत विशेष लक्ष घातलं होतं. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणात ही चौकशी झाली. निवडणूका ह्या अधिकाऱ्यांना चरण्यासाठी कुरण असतात आणि पुढारीही यावेळी मूग गिळून गप्प बसतात. हेही यातून निष्पन्न झाले आहे. राज्य आणि केंद्र सरकारला आपण यावर चांगला निर्णय घ्यायला भाग पाडू. कोणत्याही दोषी अधिकाऱ्यांला वाचवण्याचा प्रयत्न होताना दिसले तर आपण तात्काळ उच्च न्यायालय गाठू असा इशाराही अँड. अजित देशमुख यांनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close