क्राईम

बोगस एन.ए. आणि चुकीचे बाजारमूल्य तपासण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केल्या दोन समित्या

अनागोंदी कारभार जनतेसमोर येईल — अँड. अजित देशमुख

बीड — बीड शहरातील बोगस अकृषी आदेशाची प्रकरणे आणि बाजार मूल्य जास्त असताना कमी दाखवून शासनाची केलेली फसवणूक यासह माजलगाव तालुक्यातील बोगस एन. ए. ची प्रकरणे उघडकीस आली आहेत. जन आंदोलनाने तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रकरण तपासण्यासाठी दोन त्रिसदस्यीय समित्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता रजिस्ट्री कार्यालयातील अनागोंदी कारभार जनतेसमोर येईल. कारभारात गुणात्मक बदला बरोबरच दोषींवर कारवाई होईल, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

बीड मधील बेकायदेशीर रीतीने आणि बोगसगिरी करुन तयार केलेल्या अकृषी आदेशांची चौकशी यापूर्वी झाली आहे. तत्कालीन तहसीलदारांनी केलेल्या चौकशीमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यानंतर बाजार मूल्य जास्त असताना कमी दाखवणे, त्याच प्रमाणे बोगस अकृषी आदेशाचे पैसे भरून घेणे आणि त्या पावतीचा आधार घेऊन खरेदीखत नोंदविणे, अशी प्रकरणे पुढे आली आहेत. अशा सर्व प्रकारांची तक्रार जन आंदोलनाला प्राप्त झाली होती. ही देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली.

यावर चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी, बीड, उप विभागीय अधिकारी, बीड आणि सह जिल्हा निबंधक, बीड यांची नियुक्ती केली आहे.

आता माजलगाव तालुक्यात देखील बोगस अकृषी आदेशांचे रॅकेट मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत असून यात महसूल यंत्रणा ही हात धुऊन घेत असल्याचे दिसते. रजिस्ट्री कार्यालया मध्ये नियुक्त केलेले दुय्यम निबंधक नियम पाळतात की फक्त संगनमताने पैसे उकळतात. हा मुद्दा देखील या निमित्ताने पुढे येत आहे.

बनावट आदेश वापरणे आणि महसुली अभिलेख देखील नोंद घेणे, त्याचप्रमाणे बनावट व अकृषी आदेशावरून खरेदीखते नोंदवून शासनाची फसवणूक करणे, जो बनावट आदेश अनेक खरेदीखत मध्ये वापरलेला आहे, तो खोटा असल्याचे पत्र तहसीलदार यांनी दिल्यानंतर देखील खरेदीखत नोंदविने, केवळ टॅक्स भरलेल्या पावत्यांचा आधार घेणे, असे अनेक प्रकार माजलगाव मध्ये देखील घडले आहेत, त्याचीही तक्रार देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिली आहे.

माजलगाव येथील अकृषी आदेश, पावत्या कशा आधारे फाडल्या, या व अन्य बाबी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी, बीड, उपविभागीय अधिकारी, माजलगाव आणि सह जिल्हा निबंधक, बीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील रजिस्ट्री कार्यालयांमधील काळाबाजार थांबवायचा असेल तर तेथील दोन-चार दुय्यम निबंधक घरी गेली पाहिजेत. त्याचप्रमाणे महसुली अभिलेखात बनावट कागदपत्रांच्या आधारे फेरफार नोंद घेणाऱ्या लोकांना विरुद्ध कारवाई होऊन काही तलाठी आणि मंडळ अधिकारी घरी पाठवले पाहिजेत. तरच बोगसगिरी थांबेल, असे देशमुख यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे बरोबर चर्चा करताना म्हटले. आता या दोन्ही समित्यांचे निर्णय हे जनआंदोलनाचे म्हणणे मान्य करणारे असेल, कारण तसे पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे रजिस्ट्रि ऑफिस मधील कारभार सुधारण्यासाठी मदत होणार आहे. तसेच शासनाचा महसूल देखील वाढेल, असे ही अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close