आपला जिल्हा

जनआंदोलनाच्या धास्तीने डीसीसीची सभा झालीच नाही

 वैद्यनाथ वर ३५६ कोटींचे कर्ज तर कारखाना २२१ कोटीने तोट्यात– अँड. अजित देशमुख

बीड — बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड बीडच्या संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सतरा कोटीच्या कर्जवाटपाला जन आंदोलनाने तीव्र आक्षेप घेतल्याने धास्तावलेले संचालक मंडळात सभेला आलेच नाही. केवळ पाच संचालक आले. त्यांनीही दक्षता घेत पुढील तारखेपर्यंत सभा स्थगित करण्यात आलेली आहे. पुढील तारीख कळविण्यात येईल, असे पत्र घेऊनच बँक सोडली. त्यामुळे संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल जनआंदोलनाने समाधान व्यक्त केले आहे, असे अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

आज मोठे कर्जवाटप हा महत्वाचा मुद्दा वगळता अन्य मुद्दे दैनंदिन कामाचे होते. वैद्यनाथच्या कर्जाला आम्ही आक्षेप नोंदवला होता. वैद्यनाथ साखर कारखान्याकडे इतर बँकांचे मध्यम व अल्प मुदत असे एकूण तिनशे छप्पन्न कोटी रुपयांचे कर्ज असून हे सर्व कर्ज थकीत गेले आहे. तर कारखाना चक्क दोनशे कोटी रुपये तोट्यात आहे. तरीही डिसीसीचे काही लोक या कारखान्याला कर्ज देण्याच्या तयारीत होते.

शेतकऱ्यांचा कणा समजली जाणारी जिल्हा बँक गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. या बँकेला जागेवर आणण्यासाठी जन आंदोलन सातत्याने बँकेच्या कारभारावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे काही का होईना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय बँकेला घेणे भाग पडत आहे.

काल अध्यक्षांना पदावरून कमी करण्याचा आलेला निर्णय आणि आज जिल्हा बँकेची होणारी सभा या सर्व बाबी चर्चेत आल्या होत्या. जन आंदोलने याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्याबरोबर देखील संपर्क करून संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी लक्ष ठेवण्याची मागणी केली होती. तेही आज सभास्थळी हजर झाले होते.

आजच्या सभेला जिल्हा बँकेचे केवळ पाच संचालक हजर होते. अन्य संचालकांनी गैरहजर राहणे पसंत केले होते. वादग्रस्त कर्जवाटप झाले तर कारवाई होऊ नये, या उद्देशाने हे संचालक गैरहजर राहिल्याचे समजते. जे पाच संचालक हजर होते, त्यांनी देखील बँकेने कोणतेही खोटे प्रोसिडिंग लिहू नये, याची काळजी घेतली. आणि आजची सभा तहकूब झालेली आहे, पुढील सभेबाबत स्वतंत्र पत्र देऊन आपणास कळविण्यात येईल, अशा स्वरूपाचे पत्र घेऊनच बँक सोडली.

जन आंदोलनाने यापूर्वी चार कारखान्याच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करायला भाग पाडले होते. आता जर लपून छपून चुकीचे कर्ज कोणत्याही अपात्र कारखान्याला दिले, तर दोषींसाठी आपल्याला जेलचा दरवाजा उघडावा लागेल. मात्र प्राप्त परिस्थिती मध्ये संचालकांनी घेतलेली भूमिका चांगली आहे. या सर्व संचालकांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा घेऊन शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावं, असे देशमुख यांनी म्हंटले आहे.

एकूणच या सर्व प्रकाराने मोठ्या संस्थांना कर्ज वाटप करण्याचा बँकेचा उद्देश धुळीला मिसळला आहे. आता हा राहिलेला पैसा जे शेतकरी अजूनही पीक कर्जापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी वापरावा आणि गोर गरीब शेतकऱ्यांना पडत्या पावसाच्या काळात आलेल्या संकटातून बाहेर येण्यासाठी पिक कर्ज द्यावे. पीक कर्ज वाटप ही बँकेची जबाबदारी आहे. यात कसल्याही प्रकारचा उपकार करत नाही. त्यामुळे या मुद्द्यावर कुठलाही खल न घालता शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घेऊन जे शेतकरी जिल्हाभरात कर्ज मिळण्यापासून वंचित आहेत, त्यांना कर्ज वाटप करावे. जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था हे बँकेचे संचालक आहेत. त्यांनी या मुद्द्यावर लक्ष ठेवावे, असे अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close