क्राईम

जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू होताच नातेवाइकांकडून तोडफोड

जिल्हधिकार्‍यांची रुग्णालयात भेट

बीड — उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून मृताच्या नातेवाईकांनी सक्शन मशीनची तोडफोड करत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केल्याची घटना जिल्हा रुग्णालयात घडली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रुग्णालयात धाव घेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयात किडनीच्या आजाराने तसेच न्यूमोनिया झालेले संतराम थोरात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आलेल्या होत्या. बिगर कोरोना वार्डामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र संतराम थोरात हे लघवीसाठी गेले असता परत येताना खाली पडले. यावेळी कर्तव्यावर असलेले भूलतज्ञ डॉ.काशीकर यांनी रुग्णाला तातडीने व्हेंटीलेटरवर घेतले परंतु उपचार सुरू असताना या रुग्णाचा त मृत्यु झाला. या घटनेनंतर लव थोरात, कुश थोरात आणि अन्य एकाने वार्डात गोंधळ घालत सक्शन मशिनची तोडफोड केली तसेच कॉटही फेकून दिले. कर्तव्यावरील डॉक्टरांना धक्काबुक्कीही केली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना घटनेची माहिती दिल्यानंतर स्वत: जिल्हाधिकारी रुग्णालयात दाखल झाले. यावेळी कोरोना वार्डासाठी नियुक्त पोलीस कर्मचारी गायब होते. त्यानंतर पोलीसांच्या फौजफाटा रुग्णालयात दाखल झाला. गोंधळा घालणार्‍यांना पोलीसांनी अटक केली. जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. त्या वार्डाच्या बाहेर बॅरीकेट टाका आणि त्या परिसरात डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close