महाराष्ट्र

मराठा आरक्षण प्रश्नी फडणवीस सरकारच्या सांगण्यावरून बाजू मांडली नाही — महाधिवक्ता कुंभकोणी

मुंबई — मराठा संघटनांनी सोलापूरात बैठक घेऊन महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीत न्यायालयात बाजू मांडू नये, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस सरकारच्या सांगण्यानुसार जानेवारी 2019 च्या सुनावणीत आपण न्यायालयात बाजू मांडली नसल्याचा गौप्यस्फोट आशुतोष कुंभकोणी यांनी केला आहे. दरम्यान, न्यायालयात बाजू मांडली नसली तरी कागदोपत्री सरकारची बाजू भक्कम करण्याचे काम आपण यावेळी केले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात बाजू न मांडल्याने सरकारचा पराभव झाला होता, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. या आरोपाचे स्पष्टीकरण देताना एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. आपण न्यायालयात भूमिका मांडली नसली तरी कागदोपत्री सरकारची बाजू भक्कम केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात आपले आभार मानले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सोलापुरात मराठा संघटनांनी बैठक घेऊन मराठा आरक्षण प्रकरणी न्यायालयात ज्येष्ठ वकील माजी महाधिवक्ता व्ही. ए. थोरात यांनीच सरकारची बाजू मांडाली, असा ठराव संमत केला होता. त्यामुळे विशेष वकील म्हणून व्ही. ए. थोरात यांना नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सरकारने केलेल्या विनंतीनुसारच मी न्यायालयात बाजू न मांडण्याचा निर्णय घेतला होता, असे त्यांनी यावेळी सांगितले. न्यायालयात बाजू मांडली नसली तरी या मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा बनविणे, प्रतिज्ञापत्र तयार करणे, या विषयाकरील न्यायालयाचे इतर निकाल शोधणे, बैठकांचे आयोजन करणे यासारखी अनेक कामे मी केली होती, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर थोरात यांनी देखील आपल्या कामांची प्रशंसा केली होती, असे कुंभकोणी यांनी यावेळी सांगितले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close