क्राईम

तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर ‘डल्ला’, गुन्हे करण्याचे  जिल्हाधिकार्‍यांचे आदेश 

उस्मानाबाद – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याची गंभीर दखल घेत तत्कालीन धार्मिक व्यवस्थपकासह अन्य दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी मंदिराच्या पैशांचा अपहार प्रकरण उजेडात आले होते.

याप्रकरणी दिलीप देविदास नाईकवाडी यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तुळजापूर तहसीलदार तथा मंदिर संस्थांनचे व्यवयस्थापकांना पोलिसात गुन्हे नोंद करण्यासाठी प्राधिकृत केले आहे.

देवीच्या खजिन्यातील तब्बल 71 प्राचीन नाण्यासह अनेक दागिने गायब आहेत. तुळजाभवानी देवीला अनेक राजे राजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैरव्यवहार केल्याचे अपर जिल्हाधिकारी यांच्या 3 सदस्यीय चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यांत दिलीप नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवत सोने चांदीच्या दागिन्यात काळाबाजार झाल्याचे शिक्का मोर्तब केले होते.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील 71 ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती. तुळजाभवानी मातेला निझाम, औरंगजेब, पोर्तूगीज यांच्यासह बिकानेर, उदयपूर, लखनौ, बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवीच्या चरणी अर्पण केली होती. या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू व मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती. त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते.

प्रशासकीय पत्रव्यवहार व लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या या प्रकरणात नूतन जिल्हाधिकारी तथा मंदिर समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी लक्ष घालून गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. तुळजाभवानी देवीला अनेक राजे महाराजे यांनी सोने चांदी दागिन्यासह नाणी अर्पण केली होती त्याची नोंद मंदिर संस्थांच्या वहीत होती मात्र पदभार स्वीकारताना व देताना अनेक मौल्यवान वस्तू व दागिने गायब करून त्याचा काळाबाजार करण्यात आल्याचे चौकशी समितीत सिद्ध झाले आहे. देवीच्या खजिन्यातील शिवकालीन नाण्यासह इतर संस्थानची नाणी वस्तूवर डल्ला मारला असुन यात मंदिर संस्थांनचे काही अधिकारी घरचे भेदी निघाले आहेत. या घोटाळ्यातील गुन्ह्यात सहभागी अधिकारी यांची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसते.

तुळजाभवानी देवीचे हे गायब केलेले प्राचीन दागिने व 71 नाणी कोणाला देण्यात आले, याचा तपास केला जाईल. मात्र, यापूर्वी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या अनेक महागड्या वस्तू, साड्या, चांदीच्या मूर्ती या तत्कालीन मंत्री, राजकारणी व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना भेट देऊन त्याची मेहेरनजर मिळविण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे नाणी गायब करणारा व त्यामागचा खरा सूत्रधार व लाभार्थी समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अधिक चौकशी करण्याची मागणी तुळजापूर मधील नागरिकांकडून व्यक्त होत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close