महाराष्ट्र

पुण्याचे माजी महापौरही भोंगळ कारभाराचे बळी, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही करावी लागली भटकंती

पुणे — कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने अनेकांचा बळी घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्यसेवा वेळेत न मिळाल्याने अनेकांनी जीव गमावले.अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे निधन होऊन काही तास उलटत नाहीत, तोवर पुण्यातील व्यवस्थेचे वाभाडे काढणारे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय एकबोटे यांचे निधन झाले आहे, त्यांच्याबाबतही बेड मिळण्यास उशीर झाल्याने ही घटना घडली.दुर्दैवाची बाब म्हणजे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना स्मशानभूमीतही जागा मिळत नव्हती.

पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय उर्फ दत्ता गोविंद एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. दुर्दैवाची बाब म्हणजे एकबोटे यांच्या मोठ्या मुलीचे आणि मुलाचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. दत्ता एकबोटे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक रुग्णालयांकडे विचारपूस केली गेली, मात्र बेड उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमध्ये योग्य उपचार व्हावेत, यासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट, पालकमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर सुविधा मिळाल्या, परंतु तोपर्यंत एकबोटे यांची प्रकृती खालवली होती. मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, त्यांचे हाल इतक्यावरच थांबले नाही तर एकबोटे यांच्या अंत्यसंस्कारातही अनेक अडचणी आल्या. आधी त्यांचे पार्थिव कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले, मात्र तिथे जागा नसल्याने त्यांना येरवड्याला नेण्यात आले. तिथून पुन्हा कोरेगाव पार्क स्मशानभूमीत नेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि पुन्हा एकदा पुण्यात किती भोंगळ कारभार सुरु आहे याची प्रचिती आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close