देश विदेश

सर्वाधिक सदस्य संख्येचा मोठा पक्ष म्हणता अन् 80 वर्षाच्या म्हातार्‍याला बोलावता? भाजप अध्यक्षाला हजारेंनी फटकारले

अहमदनगर — जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाला 10 बाय 12 फुटाची खोलीत राहणाऱ्या 80 वर्षाच्या वृद्धाची आवश्यकता का पडावी असा प्रश्न निर्माण करत दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी चांगलेच फटकारले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी व्हावे असे पत्र दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी अण्णा हजारे यांना लिहिले होते.गुरु विरुद्ध शिष्य असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात होता. भाजपचे हे आमंत्रण नाकारत हजारे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपाला चांगलेच फटकारले आहे. 2014 साली भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न दाखवून तुमचे सरकार सत्तेत आले, परंतु जनतेच्या समस्या काही कमी झाल्या नाहीत. कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, लोकांना दिलासा मिळणार नाही. म्हणून मी दिल्लीत येऊन काही फरक पडणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे
पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की, केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. जर अशीच परिस्थिती असेल आणि दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? की भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे सर्व दावे निरर्थक आहेत असा प्रश्न हजारे यांनी भाजपला केला आहे
मी कोणताही पक्ष किंवा पार्टी पाहून आंदोलने केलेली नाहीत. मला कोणत्याही पक्षाशी घेणेदेणे नाही. फक्त गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठीच मी आंदोलन करीत आलेलो असल्याच अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close