आपला जिल्हा

“एक गाव एक गौरी”ची 200 वर्षापासून परंपरा जपणारी मालेवाडी

✍️ महादेव गीते

परळी — भारतीय हिंदु धर्म परंपरेत सण उत्सवांना वेगवेगळे महत्व आहे.प्रत्येक सण स्थानिक परंपरेनुसार साजरे केले जातात.प्रत्येक देवस्थानची किंवा त्या भागात साजऱ्या होणाऱ्या सणांची वेगवेगळी अख्यायिका आहे.दि.25 ऑगस्ट रोजी गौरी माहेरवासिन म्हणून प्रत्येकाच्या घरात विराजमान झाली. तीन दिवस राहिली आणि सासरी गेली.मात्र
परळी तालुक्यातील मालेवाडी या गावात असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिरात सर्व गावकरी एकत्र येवुन गौरी अर्थात महालक्ष्मीचा उत्सव साजरा करतात.हीअनोखी परंपरा मालेवाडी गावात शेकडो वर्षांपासुन सुरु आहे.

आज सर्वत्र एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यावर भर दिला जात असताना मालेवाडी या गावात दोन शतकापेक्षा अधिक वर्षांपासुन ‘एक गाव एक गौरी’ अशी परंपरा चालत आलेली आहे. सध्या श्री गणरायाची सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. श्री गणेशाची भगिनी असलेल्या गौरीचे आगमनही काल दि.25 ऑगस्ट रोजी झालेले आहे.परळीपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर पुर्वेकडे मालेवाडी हे गाव असून गावाच्या चारही बाजुनी मोठ-मोठे डोंगर आहेत. डोंगर कपारीत वसलेले हे गाव शेकडो वर्षांपासुन ‘एक गाव, एक गौरी’ अशी परंपरा जोपासात आले आहे. या गावात महालक्ष्मीचे मोठे मंदिर आहे.200 वर्षापुर्वी मालेवाडी येथील बदणे यांच्या स्वप्नात महालक्ष्मीने दर्शन देवुन मी तुमच्या वाड्यात रेड्याच्या पाठिमागे आली आहे असे सांगितल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी त्या वाड्यात तांदळासारखे तीन मोठे दगड दिसले.त्यांची विधीवत स्थापना केल्यानंतर त्या महालक्ष्मीने पुन्हा साक्षात्कार देत मला मोकळ्या सार्वजनिक ठिकाणी स्थापित करा असे सांगीतले तेव्हापासुन मालेवाडी येथे घरोघरी महालक्ष्मीचा उत्सव साजरा करण्याऐवजी संपुर्ण गाव या महालक्ष्मी मंदिरातच गौरी सण साजरा करु लागले.या दोन शतकात मालेवाडी येथुन स्थलांतरीत झालेले सर्व कुटुंब व गोपाळ समाज गौरी पुजनासाठी मालेवाडी त येतात.प्रत्येक कुटुंबाला पुजेसाठी वेळ दिला जातो सर्वात शेवटी ज्यांच्या पूर्वजांना साक्षात्कार झाला त्या भुराजी बदणे यांच्या कुटुंबियांकडुन पुजा केली जाते.पुजेच्या दिवशी गावातील व बाहेरुन आलेल्या महिला एकत्रित येतात.त्यामुळे या गावात कोणाच्याही घरी गौरी पुजन होत नाही. सर्वच गावकरी एकत्र येऊन या मंदिरात असलेल्या गौरींची सजावट करुन प्रत्येकजण आपआपली पुजेचे साहित्य आणून मंदिरातच कलश स्थापना करुन तीन दिवस लक्ष्मी मातेची पुजा करतात.मालेवाडी गावातून स्थलांतरीत झालेल्या मरळवाडी व इतर ठिकाणचे ग्रामस्थही ही आपल्या घरी गौरी स्थापना न करता मालेवाडी येथे जावुन लक्ष्मीची पुजा करतात.
————————————————
लक्ष्मीची आख्यायीका
मालेवाडी गावात साक्षात लक्ष्मीमातेचे वास्तव्य असल्यामुळे या गावात एकाही घरी गौरी (लक्ष्मी) मूर्तीची स्थापना होत नाही. अथवा या गावातील मुलीचे लग्न झाले तरी तिच्या घरी ही गौरीची स्थापना करण्यात येत नाही. अशा माहेरवासीनींच्या घरी केवळ कलश स्थापना करुन लक्ष्मीमातेची पुजा करण्यात येते. आधुनिक काळातही वावरत असताना ही परंपरा जोपासण्यात येत आहे. हे गाव सोडून मरळवाडी येथै वास्तव्यास गेलेल्या कै देवराव आंधळे यांच्या पत्नीेन कै. भागूबाई आंधळे यांनी लक्ष्मी (गौरी) स्थापनेचा प्रयत्न केला होता. परंतु, उभे केलेले मखर अचानक आग लागून जळून गेले होते. त्यानंतर असा प्रयत्न कोणीही केला नाही.
भुराजी बदने,ग्रामस्थ ,मालेवाडी
———————————————–
घरांना-दारे नसलेले गाव
मालेवाडी गावात लक्ष्मी मातेचे वास्तव्य असल्याने या गावाचे रक्षण करण्याची सर्व जबाबदारी ही लक्ष्मी मातेवरच असल्याची श्रद्धा या गावकर्‍यांची आहे. त्यामुळे या गावातील एकाही घराला दार बसविण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे उघडी असली तरी या गावात कधीहीचोरीची घटना घडलेली नसल्याचे गावकरी सांगतात.
————————————————-
रॉकेल व काळा कपडा वर्ज्य
या गावात पूर्वी लाईट नव्हती त्यामुळे केवळ दिवे वापरण्यात येत. मात्र, या गावात दिव्यासाठी कधीही रॉकेलचा वापर करण्यात आलेला नाही. दिव्यासाठी गोडतेलाचा वापर करण्यात येतो. त्याच बरोबर या गावात काळा कपडाही अंगावर परिधान करण्यात येत नाही. या दोन्हीही गोष्टी लक्ष्मी मातेला आवडत नसल्याने गावकरीही या दोन्हीही गोष्टी वापरत नाहीत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close