क्राईम

कोविड कक्षातून पसार झालेला कोरोना पॉझीटिव्ह दरोडेखोर पुन्हा जेरबंद

                    — ——————————-

एलसीबीची कामगिरी : बारा किमी पायी पाठलाग करून ठोकल्या बेड्या

—————————————–

 

बीड — दरोड्याच्या तयारीत मध्ये असणारी टोळी बीड ग्रामीण पोलिसांनी पकडली होती. या टोळीतील एक 24 वर्षीय आरोपी कोरोना पॉजिटिव आढळून आला होता. बीडच्या आयटीआय कॉलेज कोविड कक्षात उपचार सुरू असताना पोलिसांची नजर चुकवून तो पसार झाला होता. बावीस दिवसानंतर त्या दरोडेखोरास औरंगाबाद जिल्ह्यातून बेड्या ठोकण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. 
माळापुरी ते कुर्ला रोडवर 14 जुलै च्या पहाटे गस्त सुरू असताना बीड ग्रामीण पोलिसांनी एका कारमधून दरोडा घालण्याच्या तयारीत निघालेल्या पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले होते. यावेळी आरोपींकडून घातक शस्त्र जप्त करण्यात आली होती. या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या दरम्यान टोळीतील २४ वर्षीय आरोपी (रा. रामगव्हाण, ता. अंबड, जि. जालना) हा कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी बीडच्या आयटीआय कॉलेजच्या कोविड कक्षात ठेवण्यात आले होते. २५ जुलै रोजी त्याने पोलिसांची नजर चुकवून कोविड कक्षातून पलायन केले. या आरोपीवर जालना, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यातून तब्बल १७ गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे सराईत गुन्हेगार पसार झाल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्या फरार दरोडेखोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेतून विशेष पथकाची निर्मिती केली. विशेष पथकाने मागील २० दिवसापासून त्या दरोडेखोराचा शोध घेण्यासाठी जोरदार मोहीम उघडली होती. अखेर सोमवारी 17 ऑगस्ट रोजी पथक गेवराईत शोध मोहिमेवर असताना त्यांना हा आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड तालुक्यात डोणगाव टाका शिवारात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने सदरील ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांना पाहताच गायरानात लपलेल्या आरोपीने पुन्हा पळ काढला. परंतु, पथकातील कर्मचाऱ्यांनी तब्बल बारा किमी पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपासासाठी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. गोविंद एकीलवाले, पोलीस कर्मचारी तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे, विकी सुरवसे चालक संतोष हारके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close