आपला जिल्हा

परळीत सुरू होतेय अद्ययावत 50 बेडचे खाजगी कोविड रुग्णालय

परळी — परळीतील वाढते कोविड पॉझिटिव्ह रुग्ण, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आवाहन तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेत येथील नामांकित डॉ. सुर्यकांत मुंडे, डॉ. सतीश गुट्टे व सहकारी यांनी त्यांच्या शहरातील लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये ५० रुग्ण क्षमतेचे कोविड रुग्णालय सुरू केले असून शनिवार (दि १५) रोजी या हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत सरकारी यंत्रणेना मदत म्हणून खाजगी रुग्णालयांनी पुढाकार घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या व अत्यंत माफक दरात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर इलाज करण्यासाठी कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सना नुकतेच आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत बीड पाठोपाठ परळी येथील डॉ. सुर्यकांत मुंडे व डॉ. सतीश गुट्टे यांनी त्यांच्या लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत कोविड हॉस्पिटल उभे केले आहे. या हॉस्पिटल मध्ये ५० रुग्णांवर उपचार केले जाण्याची सुविधा उपलब्ध असून, पल्स ऑक्सीमीटर, नाश्ता, जेवण, योग्य औषधोपचार यासह अन्य सर्व बाबींची सुविधा उपलब्ध असणार आहे.

या रुग्णालयाचा शनिवार (दि. १५) रोजी आंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्या हस्ते, उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुर्मे, परळी तालुका वैधकीय अधिकरी डॉ. मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.

कोणत्याही कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला येथे उपचार घेता येणार असून, यासाठी राज्य व केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसारच बिल आकारले जाईल तसेच एखाद्या गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटर उपचारांची गरज असल्यास त्यांना तात्काळ अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णलयात पाठवण्यात येईल, अशी माहिती डॉ. सुर्यकांत मुंडे यांनी दिली.

डॉ. मुंडे, डॉ.गुट्टे यांचे अभिनंदन – धनंजय मुंडे

दरम्यान आम्ही केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अत्यंत कमी वेळेत ५० बेडचे कोविड रुग्णालय उभे करत रुग्णसेवेसाठी पुढाकार घेतलेल्या डॉ. सुर्यकांत मुंडे व डॉ. सतीश गुट्टे तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन व आभार मानतो, परळी व परिसरातील रुग्णांना याचा फायदा होईल तसेच शासकीय आरोग्य यंत्रणेवरील बराच ताण यामुळे हलका होईल; अशा शब्दात ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close