देश विदेश

टीव्हीवरील चर्चेनंतर त्यागींचा मृत्यू, संबित पात्रांविरुद्ध हत्येची फिर्याद दाखल

नवी दिल्ली —  एका राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चे नंतर बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा व संबंधित वृत्तवाहिनी विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने लखनऊ येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
लखनऊच्या हजरतगंज कोतवालीत तसेच अयोध्येतील कोतवाली ठाण्यात संबित पात्रा, वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक आणि मालकाविरुद्ध उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी कटकारस्थानाने हत्या केल्याची फिर्याद दाखल केली आहे. पात्रा यांनी या चर्चेत मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी त्यागी यांना जयचंद म्हणून संबोधले आणि कपाळावर टिळा लावल्याने कोणी हिंदू होत नाही, अशी वैयक्तिक टीका केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्यागी यांचा हृदयगती बंद पडून मृत्यू झाल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे. 

त्यागी यांच्या निधनामुळे वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांच्या खालावलेल्या स्तरावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चा अर्थहीन, विषारी आणि जीवघेण्या ठरत आहेत. यावर वृत्तवाहिन्याचे मालक, संपादक आणि अँकर्सनी आत्मचिंतन करण्याची ही घडी असल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केली आहे. या चर्चांमधील शब्द कधी कधी पिस्तुलातील गोळीसारखे ठरत असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या विषारी चर्चा आणि विषारी प्रवक्ते संयम आणि साधेपणाने चर्चा करणाऱ्यांचे आणखी किती जीव घेणार आणि अशा चर्चांनी किती काळ टीआरपीचा धंदा चालवणार, असा सवाल काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. माजी केंद्रीय माहिती व नभोवाणीमंत्री मनीष तिवारी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगील यांनीही त्यागी यांच्या निधनावरुन वृत्तवाहिन्यांवरील घसरणाऱ्या चर्चेच्या स्तरावर टीका केली आहे. 
दरम्यान, दिल्लीच्या सीमेवरील गाझियाबाद येथे राहणारे त्यागी यांच्या पार्थिवावर सकाळी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात हिंडन स्मशानघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close