हिंगणीच्या जि प शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून उलगडला शिवचरित्रपट

चौसाळा — येथून जवळच असलेल्या हिंगणी बू. जि प शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून उलगडलेल्या शिवचरित्रामुळे उपस्थितांच्या मनाचा ठाव घेत अक्षरशः अंगावर रोमांच उभा केले. याबरोबरच रक्तदान शिबिर, स्पर्धा, पोवाडे, शिवचरित्र व्याख्यानाच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात आली.
हिंगणी बू. येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पाळणा व नृत्याच्या माध्यमातून उपस्थित शिवप्रेमी समोर शिवचरित्र उलगडून दाखवले. महाराजांनी मावळ्यांना सोबत घेत रायरेश्वरासमोर स्वराज्याची घेतलेली शपथ,शिवाजी महाराज अफजल खान भेट, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली खिंड, तानाजी मालुसरेंचा
कोंढाणा विजय, शाहिस्तेखानाची फजिती, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडी चोळी देऊन केलेली पाठवणी, राज्याभिषेक हा त्यांचा जीवन चरित्र पट कलेतून सादर केला. कार्यक्रम पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. आपणही शिवकाळ अनुभवला आहे की काय असा आभास निर्माण करत उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला.
याबरोबरच आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. 50 हून अधिक जणांनी रक्तदान करून शिव जन्मोत्सव सोहळा साजरा केला. शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ह भ प माऊली महाराज कोठुळे यांचे शिवचरित्र पर कीर्तन ठेवण्यात आले होते. याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा घेण्यात आल्या.
जि प शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाविष्कार सादर केल्यामुळे सागर पितांबरदास वैष्णव या युवकाने सर्व
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हिंगणी ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जि प शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ पवार, महेश फसले, जितेंद्र अवताने, सरफराज सिद्दिकी यांचा सत्कार करण्यात आला.