कृषी व व्यापार

हक्काची मोरी मुतायची चोरी; उबाळे साहेब..! शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवायचाय का?

बीड — शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या 20 दिवसापासून एटीएमची कार्ड शोभेची वस्तू बनले आहेत तर दुसरीकडे शाखांमध्ये पैसा नाही.हक्काचा पैसा असून शेतकऱ्यांना उपलब्ध होणं अवघड झाला आहे.शेतकरी आजारी पडला तर पैसा नाही म्हणून उपचाराभावी त्यानं मरायचं का? उबाळे साहेब तुमची कार्यपद्धती शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवणारी आहे. बँकेतला पैसा बुडतो की काय या शंकेने घर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातला “रवी” अस्तंगत होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे
मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांना डीसीसी बँकेने एटीएम कार्ड वाटप केली.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पाहिजे त्या वेळेला पैसा उपलब्ध होईल त्याला बँकेच्या शाखेकडे येण्याची आवश्यकता भासणार नाही.अशा बढाया मारण्यात आल्या.पिक विमा असो अनुदान असो की प्रधानमंत्री सन्मान निधीची रक्कम असो ही या बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.शेतकऱ्यांना एटीएम मिळाल्यामुळे आपल्याला कधीही पैसा उपलब्ध होईल अशी आशा निर्माण झाली मात्र ही आशा औट घटकेचीच ठरली. बँकेने शेतकऱ्यांना एटीएम दिले आहेत म्हणून जिल्ह्यात असलेल्या शाखांचा वित्त पुरवठा बंद केला. गेल्या वीस पंचवीस दिवसापासून एटीएम सेवा बंद पडली. शाखांमध्ये देखील पैसा नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नाड्या बंद करण्याचं काम केलं गेलं आहे. यातूनच एखादा शेतकरी आजारी पडला तर बँकेत खात्यावर पैसा असूनही उपलब्ध होत नाही म्हणून त्याच्यावर उपचार अभावी मरणाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.अडीअडचणी निभवण्यासाठी सावकारांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. बँकेच्या कारभारामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून नावा रूपाला आलेल्या बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये बँकेच्या कारभारामुळे वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.बँकेचे व्यवस्थापक रवी उबाळे जिल्ह्याच्या शिरपेचात शेतकरी आत्महत्यांच्या मानाचा तुरा खोवण्याच्या तयारीत असल्याचं दिसू लागला आहे. हक्काचा पैसा असून सध्या शेतकरी मात्र चोर ठरू लागला आहे. बँकेतील पैशावर अधिकाऱ्यांनी डाका तर घातला नाही ना? या शंकेने शेतकरी धास्तावला आहे. नुकतेच चौसाळा शाखेतील तीन कर्मचारी आर्थिक घोटाळ्यामुळे निलंबित करण्यात आले आहेत.बँकेच्या कारभाराने हक्काची मोरी मुतायची चोरी असं गमतीने म्हटलं जाऊ लागला आहे. एकंदरच बँकेचा कारभार पाहता शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवण्याची पूर्ण तयारी बँकेने केली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बँकेला नफ्यात आणायचा असेल तर शेतकऱ्यांनी अडीअडचणी बाजूला ठेवाव्यात थोडी गैरसोय सोसावी अशी निर्लज्ज उत्तर देखील बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळू लागली आहेत. स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी देखील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरायचं काय? वीस ते पंचवीस दिवस एटीएम चे व्यवहार ठप्प होतात अशावेळी अधिकारी झोप काढतात का? बँकेचा कारभार लवकर सुरळीत होईल का? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button