आपला जिल्हा

धोंडराई जवळील तळणेवाडी येथे भगरीतून 60 ते 70 जणांना विषबाधा

गेवराई — गेवराई तालुक्यातील धोंडराई जवळ असलेल्या तळणेवाडी येथे गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्ल्यामुळे 60 ते 70 जणांना विषबाधा झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान बाधित रुग्णांना बीड व गेवराई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या टीमने या ठिकाणी भेट देऊन उर्वरित रुग्णावर उपचार केले आहेत.
धोंडराई पासून जवळच असलेल्या तळणेवाडी येथे गोकुळाष्टमीच्या उपवासासाठी गावातीलच किराणा दुकानातून भगरीचे पीठ , भगर लोकांनी खरेदी केली. कालही श्रावणी सोमवार निमित्त काहीजणांनी भगर खरेदी केली होती ,मात्र काल काही जणांना नकळत त्रास जाणवला परंतु आज गावातील बहुतांश लोकांना ही भगर खाल्ल्यानंतर मळमळणे, उलट्या, जुलाब यासारखा त्रास जाणवू लागला. गावातील नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी विषबाधित लोकांना गेवराई येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला ही संख्या वीस ते तीस होती. मात्र दुपारी पाच वाजल्यानंतर विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या 60 ते 70 वर जाऊन पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने या ठिकाणी धाव घेऊन आणखी कोणाला जर त्रास जाणवत असेल तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन केले. याबरोबरच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी या ठिकाणी जाऊन आणखी 30 ते 40 जनांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय केले. शंभरहून अधिक लोकांना विषबाधा झाल्यामुळे तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान विषबाधा झालेल्या रुग्णावर बीडच्या शिवकमल हॉस्पिटल व गेवराई येथील डॉक्टर काळे यांच्या कुसुम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. निर्मला नरवडे, सुधामती धस, सुनिता धस, अशोक शिंदे, राधा शिंदे, उद्धव जरे, रामेश्वर धस, गणपती एडके, तुळसाबाई शिंदे, सौमित्रा शिंदे, तारामती नरवडे, उषा भिलारे, भाऊसाहेब खरसाडे यांच्यासह विष बाधितांचा हा आकडा जवळपास शंभर वर जाऊन पोहोचला आहे दरम्यान अन्न औषध प्रशासन च्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिली असून भगरीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close