आघावांच्या दुर्लक्षाने गेला दिनेश मतेचा जीव; एस पीं चे चौकशीचे आदेश, चौकशीत क्लीन चिट मिळावी यासाठी लॉबी सक्रिय!

बीड — पिंपळनेरच्या बाळासाहेब आघाव यांच्या वादग्रस्त कार्यशैलीमुळे उच्च पदस्थ अधिकाऱ्याला देखील बदनामीला सामोरे जावे लागले होते. आता तीच स्थिती पुन्हा निर्माण झाली असून दिनेश मते खून प्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते तर मतेचा जीव वाचला असता अशी फिर्याद मयताच्या पत्नीने पोलिसात दिली आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांच्यावर जबाबदारी दिली आहे. असं असलं तरी आघाव यांना वाचविण्यासाठी लॉबी सक्रिय झाली आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांची कार्यशैली नेहमीच वादग्रत राहिली आहे. या ठाण्याच्या हद्दीत आजही अवैध धंद्यांना प्रचंड ऊत आलेला असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अनेक वेळा निर्माण झाला.या ठाण्याच्या हद्दीत कायद्याचं राज्य नसल्याचं जनता उद्विग्नपणाने बोलते. यापूर्वीच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यकाळात देखील वाढलेल्या अवैध धंद्यामुळे व हप्ताखोरीमुळे हे ठाणं माध्यमांच्या नेहमीच चर्चेत राहिलं. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी माध्यमांची वेळीच दखल न घेतल्यामुळे दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई न केल्यामुळे शेवटी तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या कार्य शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. परिणामी हा प्रश्न विधानसभेत मांडला गेला व त्यांना मानहानीकारक बदलीला सामोरे जावे लागले. आता सुद्धा तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ लागली आहे. अवैध धंद्यांसोबतच खून प्रकरणामुळे बाळासाहेब आघाव यांचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 19 जानेवारी रोजी दिनेश मते याची हत्या झाल्याचं उघडकीस आलं होतं. दिनेश श्रीमंत मते रा. शहाजानपूर लोणी याचे काही जणांशी भांडण झाले. यावेळी दिनेशला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत पिंपळनेर पोलिसात त्याने धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्याची फिर्याद घेतली नाही. एवढेच नाही तर पोलीस ठाण्याच्या आवारातून त्याला हाकलून देण्यात आलं. विशेष म्हणजे मारहाण करणारे देखील यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित होते.जमाव जमलेला असताना देखील पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेतली नाही. साधी चौकशी करावी याची तसदी देखील घेतली गेली नाही. पोलीस ठाण्याच्या गेटवर जमाव जमलेला असताना देखील पोलिसांना संशयास्पद काहीच वाटलं नाही. याच दिवशी दिनेश मते बेपत्ता झाला. दिनेश मतेचे कुटुंबीय देखील फिर्याद देण्यासाठी पोलिसात गेले. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला मात्र पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. शेवटी लिंबारुई शिवारातील तलावात त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या ठिकाणी देखील पोलिसांची संशयास्पद भूमिका राहिली त्यांना या घटनेचा काहीच वाटलं नाही. शेवटी न्याय मिळवण्यासाठी मतेच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. त्यावेळी पिंपळनेर पोलीस जागे झाले त्यांनी एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिनेश मते ला मारहाण होत असल्याचे चित्रण सापडले या आधारावर पोलिसांनी महारुद्र मते मुरलीधर लांडे, गोपीचंद लांडे या तीन जणांना ताब्यात घेतले दरम्यान या प्रकरणी दिनेश मतेच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांना जबाबदारी दिली आहे.दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांना क्लीन चीट मिळावी यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची लॉबी सक्रिय झाली असल्यामुळे या प्रकरणात कितपत न्याय मिळेल हे सांगणे अवघड आहे. मात्र कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नक्कीच न्याय भूमिका घेतील अशी अपेक्षा जनसामान्यातून व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी दिनेश मतेच्या फिर्यादीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांची सखोल निष्पक्ष चौकशी केली जाईल व त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे