केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

केज — येथील संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला या हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
नायब तहसीलदार आशा वाघ आज दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे गाडीवरून येत होत्या.यावेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांच्या अंगावर टाकण्यात आले. त्यांना भर रस्त्यात जाळण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. मात्र, यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत.यापूर्वी सख्ख्या भावानेच जीवघेणा हल्ला केला होता.येथील तहसील कार्यालयात घुसून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना 6 जून 2022 रोजी घडली होती. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.