पती-पत्नीसह बाळंतीण मुलीचा खून करणाऱ्या दरोडेखोरांना जन्मठेप

बीड — सशस्त्र हल्ला करत दरोडेखोरांनी पती-पत्नीसह बाळंतपणासाठी आलेल्या मुलीचा खून केल्याची घटना पाच वर्षांपूर्वी गेवराई येथे घडली होती. याप्रकरणी दोन दरोडेखोरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गेवराई शहरातील गणेशनगरातील सरस्वती कॉलनीत बँक अधिकारी आदिनाथ उत्तमराव घाडगे वय 50 वर्ष राहत होते.24 ऑगस्ट 2017 रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कटावणीने कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी आदिनाथ व अलका घाडगे वय 42 यांच्यावर धारदार शस्ञांनी हल्ला चढवला. यानंतर बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव वय 22वर्ष स्वाती घाडगे वय 18वर्ष या दोन्ही मुलींवरही धारदार शस्ञाने हल्ला करून ऐवज लुटला होता. यात जखमी वर्षाचा उपचारादरम्यान वर्षभरानंतर मृत्यू झाला होता. गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. त्यानंतर सोमा शेरू भोसले रा. केकतपांगरी, ता.गेवराई, हमु. अचानकनगर, गेवराई व लखन प्रताप भोसले रा.कौडगाव घोडा, ता.परळी यांना अटक केली होती. आरोपींकडून घाडगे यांच्या घरातून चोरून नेलेला मोबाइल हस्तगत केला होता. तपास करून उपाधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
22 साक्षीदार तपासले
प्रमुख जिल्हा सत्र न्या. हेमंत महाजन यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. त्यांनी 22 साक्षीदार तपासले. अजय राख यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्या. हेमंत महाजन यांनी दोन्ही आरोपींना 16 जानेवारीला दोषी ठरवले. 17 जानेवारीला जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.