राजकीय

बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलणार? फडणवीसांशी पंकजा मुंडेचा दुरावा तर जयदत्त क्षीरसागरांची जवळीक

बीड — संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्याचवेळी पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहात फडणवीसांशी असलेली जवळीक दाखवत येणाऱ्या काळातील बदलत्या राजकीय समीकरणाची झलक दाखवून दिली. 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आपले पत्ते राजकीय सारीपाटावर फेकायला फडणवीसांनी सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.सध्या या घटनांवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांगत असलेल्या पंकजा मुंडे यांचा बीड हा बालेकिल्ला समजला जातो.परळीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांची जनतेशी असलेली नाळ तुटू लागल्याचं पाहायला मिळू लागलं.यापूर्वी सत्तेत मंत्रिपदावर असताना देखील मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हणत पंकजा मुंडेंनी फडणवीसांना शह दिला. त्यानंतर भाजपात त्यांचं राजकीय पतन सुरू झालं.ही बाब मात्र स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या तालमीत वाढलेल्या पंकजा मुंडे यांच्या कळलं असलं तरी वळलं. हवेत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्लाचा पाया जनसंपर्का अभावी खिळखिळा होऊ लागला. ज्या स्व. गोपीनाथराव मुंडेंच नाव घेतल्याशिवाय भाजपाला आजही कुठलंच पाऊल टाकता येत नाही. त्याच भाजपने स्व. मुंडे सारख्या मातब्बर नेत्यावर देखील पक्ष सोडण्याची वेळ आणली होती. हा इतिहास सर्वश्रुत आहे. काहींशी तशीच परिस्थिती पंकजा मुंडे यांची देखील केली जाऊ लागली त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.पक्षात घुसमट होत असली तरी राजकीय अडचणींपोटी अजूनही पंकजा मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभूत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रसद पुरवली होती. याची जोरदार चर्चा देखील राजकीय वर्तुळात केली गेली. पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस ज्या व्यासपीठावर आहेत त्या व्यासपीठावर जाण्याचं टाळत आहेत. हे लक्षात न येण्या इतपत जनता दुधखूळी निश्चितच नाही. गहिनीनाथ गडावरील आजच्या कार्यक्रमाला देखील त्यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे वाढते दौरे ही बाब देखील खटकू लागली आहे. सर्वच बाजूंनी पंकजा मुंडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी सुरू केल्याचं बोललं जाऊ लागला आहे. त्यांच्या वाढत्या दौऱ्याने पंकजा मुंडे यांच्या खिळखिळ्या झालेल्या बालेकिल्लाचे बुरुज ढासळायला फारसा वेळ लागणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात तरी पंकजा मुंडे यांनी जनतेत मिसळून काम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वडिलांच्या पुण्याईवर पंकजा मुंडेंची नौका राजकीय सागरात कधीच पैल तिरावर लागणार नाही. हे लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पंकजा मुंडे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षात येण्याची साद घातली गेली .त्याचवेळी आजच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर यांनी आवर्जून उपस्थिती लावली.त्यामुळे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत नसलेले जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वळचणीला गेले असल्याचे संकेत आज मिळाले.जयदत्त क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यात अजूनही पकड मजबूत आहे. याचा फायदा पंकजा मुंडे यांच्या विरोधात बारामतीकरांना जबरदस्त शह देणारे मुरब्बी देवेंद्र फडणवीस निश्चितच घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात पंकजा मुंडे यांना सावध भूमिका घेत जनमानसात मिसळून आपला बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे असं राजकीय विश्लेषक मत व्यक्त लागले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button