सावधान! महाराष्ट्रात येणार थंडीची लाट

मुंबई –जानेवारीच्या सुरूवातीपासून सुरू झालेल्या कडाक्याचा थंडीचा परिणाम राज्यातील प्रत्येक भागात दिसत आहे. दरम्यान किमान तापमानात चढ – उतार सुरूच आहेत.
किमान तापमानात पुन्हा घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात थंडी राहण्याची शक्यता आहे. आज दि. 15 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा असाच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात गारठा वाढला आहे. काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आहे.
शनिवार दि14 जानेवारीला निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 5.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा खाली होता.
उर्वरित राज्यातही किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. कमाल तापमानातही वाढ-घट सुरूच असून, जवळपास अनेक ठिकाणी तापमान 28 अंशांच्या वरच आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात तापमानात किंचीत वाढ झाली आहे. तर पुणे, मुंबईतही तापमान
वाढल्याचे दिसून आले.
उत्तर भारताच्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रावर होणार.
दरम्यान पुढच्या काही दिवसांत हाडे गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव उत्तर भारताला येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता असून, या शतकात प्रथमच तापमान उणे 4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
मागील पंधरवड्यापासून संपूर्ण उत्तर भारत हाडे गोठवणाऱ्या थंडीच्या लाटेचा अनुभव घेत आहे. राजधानी दिल्ली तर दीड अंश तापमानापर्यंत खाली आहे. काश्मीर व हिमाचलात तापमान उणे 2 ते 4 अंशांपर्यंत पोहोचले आहे; पण उत्तर भारतातील पठारी अद्याप तापमान 5 अंशाच्या खाली न आल्याने थंडीची लाट सोम्य आहे. परंतु पुढच्या काही दिवसांत उत्तर भारताच्या पठारी भागांत तापमान उणे 4 अंश इतके खाली जाण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ते 19 जानेवारी हे दिवस उत्तर भारतासाठी सर्वाधिक थंडीचे असणार आहेत. त्यातही 16 ते 18 जानेवारी या कालावधीत थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात सलग 11 दिवस कडाक्याच्या थंडीचे राहण्याचा प्रकार गेल्या काही दशकांत प्रथमच घडला आहे; पण जर आगामी काळात पारा उणे 4 च्या आसपास गेला, तर ते या शतकातील पठारी भागाचे नीचांकी तापमान ठरणार असल्याचे सांगण्यात आले.