‘साईप्रसाद’च्या गुळ पावडरचा बाजारात गोडवा; बळीराजासाठी ठरणार वरदान

बीड — बीड जिल्हा ऊस उत्पादकांचा जिल्हा. मात्र याच जिल्हयात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न नेहमीचाच. साखर कारखानदारीने जिल्हयाच्या अर्थचक्राला गती दिली असली आणि जिल्ह्यातील साखर कारखान्यांची क्षमता वाढत असली तरी ऊसाचे क्षेत्र ही वाढते असल्याने बीड जिल्हयात उद्योगाचे एक नवे दालन उघडलेय, ते गुळ उद्योगाचे. गुळ आणि गुळ पावडर निर्मितीचा, अगदी एका साखर कारखान्या एवढाच मोठा असणारा उद्योग ‘साईप्रसाद’च्या माध्यमातून उभारलाय चार तरुणांनी. या ‘साईप्रसाद’च्या गुळ पावडरचे उत्पादन आता सुरु झाले असून विक्रीलाही सुरुवात झाली आहे. संक्रांतीच्या काळात साईप्रसादच्या गुळ पावडरने बाजारात गोडवा निर्माण केला आहे. हा गोडवा शेतकऱ्यांच्या जीवनातही निर्माण होणार आहे.
बळीराम गवते, साईनाथ परभणे, महेश दाभाडे, प्रज्ञेश पराड हे सारेच युवा चेहरे. उद्योग क्षेत्रात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेले. याच चार चेहऱ्यांनी एकत्र येऊन गुळ उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. गेवराई तालुक्यातील हिरापुर हे गाव निवडलं अन ‘साईप्रसाद’ गुळ उद्योगाची पायाभरणी सात आठ महिन्यापुर्वी झाली. तब्बल १२५० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेचा उद्योग वेगाने उभारण्याचे आव्हान पेलणं सोपं नव्हतं, त्यातच यावर्षी पावसानेही जास्तच लाऊन धरलं, त्यामुळे ‘साईप्रसाद’च वेळापत्रक काहीसं बदललं. मात्र अवघ्या सात आठ महिन्यात ‘साईप्रसाद’ सुरु झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी गुळ पावडरचे पहिले पोते बाहेर आले. ते नगद नारायणाच्या पायी अर्पण करण्यात आले. आता रोज हजार टनाचे गाळप ‘साईप्रसाद’च्या माध्यमातून सुरु झाले आहे. हा उद्योग बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार आहे.