पंकजा मुंडे च्या बालेकिल्ल्यावर फडणवीसांचे लक्ष? राजकीय चर्चा रंगू लागल्या

बीड — संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत. मात्र पंकजा मुंडे च्या बालेकिल्ल्यातील फडणवीस यांचा 15 दिवसातील दुसरा दौरा राजकीय विश्लेषकांना भुवया उंच करायला लावणारा असून चर्चेला उधाण आले आहे
बीड हा पंकजा मुंडे यांचा गड समजल्या जातो.
देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पंकजा मुंडे यांच्या निवडणुकीतील पराभवास देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना दुर्लक्षित केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा नेहमीच होत आली आहे. शिवसेना नेत्यांनी देखील पंकजा मुंडे यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचं सांगत पायघड्या घातल्या आहेत. भाजपमध्ये आपण नाराज नाहीत असं किती जरी पंकजा मुंडे यांनी जाहीर सांगितलं तरी त्यांच्या वक्तव्यावरून त्यांची नाराजी पक्षात होणारी घुसमट उघडकीस आली आहे. या सर्व बाबींचा विचार करता पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे की काय? अशी शंका राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.1 जानेवारीला विनायक मेटेंच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी फडणवीसांनी उपस्थिती लावली होती. मात्र मुंडे भगिनी या कार्यक्रमात न दिसल्यानं पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली होती. आता 15 जानेवारीला देखील देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर येत आहेत. संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. मुंबईमध्ये भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या सर्व कार्यक्रमांना मुंडे भगिनी मात्र गैरहजर राहिल्याचं चित्र पाहायला मिळाल आहे. एकंदरच देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे की काय? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे. दरम्यान राजकीय चर्चांना उधान आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.