चौसाळा डीसीसीत घोटाळे सुरूच; मयताच्या खात्यावरील एक लाख रुपये गायब

बीड — जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेतील घोटाळा थांबायचे नाव घेत नाही,मध्यंतरी शेतक-यांच्या नावावरील महात्मा ज्योतीराव फुले प्रोत्साहनपर कर्जमुक्ती योजनेंतर्गत अनुदान परस्पर काढण्यात आले असताना आता मयताच्या खात्यातील १ लाख रूपये गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून मयताच्या मुलाने लेखी तक्रार पोलीस अधिक्षक बीड,मुख्य शाखा बीड जिल्हा मध्यवर्ती बँक यांना दिली आहे.
मौजे. कानडीघाट ता.जि.बीड येथील मयत शेतकरी ग्यानबा बलभीम झोडगे यांचा मृत्यु दि.२३ मे २०१९ रोजी झालेला असतानाच त्यांच्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेतील खाते क्रमांक ००१३११००२००१९४७ मधील लाख रूपये दि.२८ ऑगस्ट २०१९ रोजी ४७ हजार ७०० ,दि.२२ ऑगस्ट २०१९ रोजी १३ हजार ६०० ,दि.२३ डिसेंबर २०१९ रोजी १६ हजार,दि.०२ मार्च २०२० रोजी २३ हजार २०० रूपये एकुण १ लाख ५०० रूपये परस्पर खात्यातमधुन गायब झाले असून संबधित प्रकरणात संबधितांवर गुन्हे दाखल करून आमची रक्कम परत देण्यात यावी अशी तक्रार पोलीस अधिक्षक बीड,मुख्य जिल्हा मध्यवर्ती बँकेत केली आहे.
चौसाळा शाखेत रॅकेट कार्यरत
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत बॅक आधिकारी आणि दलाल यांचे रॅकेट कार्यरत असुन मोठ्याप्रमाणात शेतक-यांची आर्थिक फसवणूक होत असून संबधित प्रकरणात (S.I.T.) स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी समाजसेवक डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.