एक एप्रिल पासून कच्च्या सोयाबीन तेलावर आयात शुल्क लागू होणार; सोयाबीन दर वाढणार

मुंबई — केंद्रातील मोदी सरकारने दोन वर्षासाठी वीस लाख टन शुल्कमुक्त आयातीला गेल्यावर्षी परवानगी दिली. मात्र पुढील आर्थिक वर्षापासून शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे एक एप्रिल पासून कच्च्या सोयाबीन तेलावर आयात शुल्क लागणार असल्याने सोयाबीन तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे. याचा आधार सोयाबीनला मिळू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर तेजीत असल्याने देशांतर्गत बाजारपेठेतील दर देखील मागील वर्षी वाढले होते. मोदी सरकारने महागाईचे कारण पुढे करत 24 मे 2022 रोजी सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क काढण्याचा निर्णय घेतला. दोन वर्ष प्रत्येकी 20 लाख टन कच्चे सोयाबीन तेल तसेच कच्चे सूर्यफूल तेल शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली. 2022-23 व 2023-24 या दोन वर्षात चाळीस लाख टन तेलाची आयात होणार होती पण आता आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे भाव कमी झाले आहेत. पाम तेल 30 टक्क्यांनी स्वस्त झाले सोयाबीन दहा टक्के तर सूर्यफूल तेल सात टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे एक एप्रिल 2023 पासून कच्च्या सोयाबीन तेलाच्या शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल आयातीवर शुल्क लागणार आहे. असं असलं तरी सूर्यफूल तेलाची शुल्कमुक्त आयात पुढील वर्षी देखील सुरू राहणार आहे. आयातीचा परिणाम सोयाबीन तेल बाजारात स्वस्त राहिले. याचा परिणाम सोयाबीन दारावर देखील होत होता.
सोयाबीनला दराला आधार मिळणार
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसापासून सोयाबीनचे दर वाढले आहेत. सोया पेंडचा भाव तेजीत आहे. मात्र खाद्यतेलाचे दर कमी आहेत. पण केंद्राने आयोग शुल्क लागू केल्याने सोया तेलाचे दर वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो असा अंदाज बाजारातील अभ्यासाकांनी व्यक्त केला आहे.