रोड रॉबरीचा बनाव करणारे मित्र स्थानिक गुन्हे शाखेने पकडले

बीड — धामणगाव – कडा रोडवर मागून आलेल्या स्विफ्ट कार मधील दोघांनी चाकूचा धाक दाखवत तीन लाख रुपयांची पैशाची बॅग पळवल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादीनेच मित्राच्या मदतीने चोरीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.
आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव येथील आदेश गौतम बोखारे हा कडा येथील राहुल पटवा याच्या दुकानात काम करत होता. नेहमीप्रमाणे त्याने उधारीचे पैसे गोळा करून तो 11 जुलै 2022 रोजी धामणगावहून कड्याकडे दुचाकीवरून निघाला. याच रोडवरील गितेवाडी शिवारात अनोळखी लोकांनी स्विफ्ट गाडी आडवी लावत चाकूचा धाक दाखवून बॅगमधील तीन लाख अकरा हजार रुपये घेऊन गेले अशी फिर्याद पोलिसात दिली होती. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी समांतर तपास करत असताना हा बनाव असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. नऊ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आदेश गौतम बोखारे वय 22 वर्ष रा.चोभानिमगांव महेश त्रिंबक करडुळे वय 23 वर्ष रा. धिर्डी यांना सापळा
लावून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी वर्गमित्रांच्या मदतीने पैसे चोरले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, अंमलदार प्रसाद कदम यांनी केली. सदरील आरोपीला अंभोरा पोलिसाच्या ताब्यात दिले असून अंभोरा पोलिस पुढील तपास करत आहेत.