राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सुनावणी

मुंबई — राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर मंगळवार दि. 10 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या खंडपीठाकडे ही सुनावणी होणार की सात जणांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपविले जाणार, याचा निर्णय या सुनावणीत घेतला जाणार आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावरील न्यायालयीन सुनावणीत 2016 सालच्या अरुणाचल प्रदेशातील नाम राबिया प्रकरणाचा संदर्भ वारंवार दिला जातो. या प्रकरणातील सुनावणी पाच जणांच्या घटनापीठापुढे झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी त्यापेक्षा मोठ्या म्हणजेच सात जणांच्या घटनापीठापुढे करावी, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने मागच्या सुनावणीत केली होती. तसेच सध्याच्या न्यायालयीन लढ्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद करायचा, याबाबत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे म्हणणे मांडावे, असे निर्देश घटनापीठाने मागील सुनावणीत दिले होते. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर काय निर्णय होतो याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.