अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान सभेचे धरणे

बीड — अतिवृष्टीची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, पिक विमा वितरणात पारदर्शकता आणावी या व अन्य मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली मात्र अद्याप ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच नाही. खरीप 2022 चा पिक विमा वितरण पारदर्शी करावे, नुकसानीची तक्रार दिल्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विमा अजून मिळाला नाही. ज्यांना मिळाला तो नुकसानीच्या प्रमाणात नाही. एकाच महसूल मंडळात व गटातही एकाच पिकासाठी मिळालेल्या विमा वितरणात तफावत आहे. त्यासाठी विमा वितरणाच्या नुकसानीच्या याद्या विमा पोर्टलवर ऑनलाईन प्रकाशीत करून विमा वितरणात पारदर्शकता आणावी यासह इतर मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काशीराम सिरसाट, मुरलीधर नागरगोजे, पांडुरंग राठोड, कॉ. दत्ता डाके, अॅड. अजय बुरांडे, गंगाधर पोटभरे, विष्णू देशमुख, जगदीश फरताडे, भगवान बडे, कृष्णा सोळंके, दादासाहेब सिरसाट, संजय चोले, सावळाराम उबाळे, अशोक डाके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.