नेकनूरच्या हजारेंनी खडकत येथे मारलेल्या छाप्यात कत्तलीसाठी डांबलेल्या 35 वासरांसह दहा गाईंची सुटका

बीड — कत्तलीसाठी पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या 10 गाई तसेच 35 वासरांची नेकनूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या पथकाने छापा मारून सुटका केली. ही कारवाई आष्टी तालुक्यातील खडकत येथे सोमवार दि. 9 जानेवारी रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास केली. याप्रकरणी दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तौफिक तय्यब कुरेशी व अजरुद्दीन नईम शेख (दोघे रा.खडकत,ता.आष्टी) अशी आरोपींची नावे आहेत.खडकत येथील प्राथमिक शाळेजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गोवंशीय डांबून ठेवले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना मिळाली होती.त्यानंतर नेकनूर चे सहायक निरीक्षक विलास हजारे यांना कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिली. सूचना मिळताच सपोनि. हजारे यांनी खडकत येथे जाऊन आष्टी ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देत त्यांना सोबत घेवून शाळेजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा मारला. यावेळी तेथे काळ्या-पांढऱ्या रंगाची तब्बल 31 वासरे पाणी- चाऱ्याची कोणतीही सोय न करता डांबून ठेवलेली आढळून आली.या ठिकाणी कोणीही आढळून आले नाही. त्यामुळे परिसरात विचारणा केली असता, हे शेड तौफिक तय्यब कुरेशी याच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान याच पत्र्याच्या शेड शेजारी असलेल्या अन्य एका शेडमधून जनावरांच्या ओरडण्याचा आवाज पोलीसांना आला. त्यामुळे पथकाने त्या शेडमध्ये धाव घेतली असता तिथे 10 गायी व 4 वासरे आखूड दोर बांधून कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवल्याचे दिसुन आले. हे सर्व 45 गोवंशीय प्राणी 2 लाख 82 हजार रूपये किमंतीचे आहेत. या प्रकरणी आष्टी ठाण्याचे उपनिरीक्षक अजित चाटे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, अप्पर अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास हजारे, हवालदार डोंगरे, हवालदार बळवंत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनवणे, आरसीपी टीम यांनी ही कारवाई केली.