कृषी व व्यापार

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन दर वाढीमूळे जानेवारीत बाजार भाव चांगला मिळणार !

मुंबई — जानेवारीत देशातील सोयाबीन बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम जाणवू शकतो. आंतराष्ट्रीय बाजारात अनेक ठिकाणी ४ जानेवारीपर्यंत व्यवहार बंद असतील. पण सुट्ट्या संपल्यानंतर भारतीय सोयापेंड आणि सोयाबीनला मागणी वाढू शकते. त्यानंतर दरात सुधारणा होईल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात सोयाबीन दरात चढ उतार होते. मात्र आठवड्याच्या शेवटी दरात वाढ पाहायला मिळाली. पण देशातील सोयाबीन बाजार एका भावपातळीवर ठाण मांडून होता.येत्या आठवड्यात सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. संपलेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ पाहायला मिळाली. अर्जेंटीनातील दुष्काळी स्थिती, चीनकडून मागणी वाढण्याची शक्यता आणि खाद्यतेल
दरवाढीचा आधार सोयाबीनला मिळाला. सोयाबीनचा बाजार १४.८४ डॉलर प्रतिबुशेल्सवर सुरु झाला होता. नाताळच्या सुट्ट्यांनंतर बाजार सुरु झाल्यानं बाजाराला चांगला आधार पाहायला मिळाला. रुपयात हा दर ४ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल होतो. त्यानंतर आठवडाभर सोयाबीन दरात चढ उतार राहीले. सोयाबीनला उच्चांकी १५.३४ डॉलरचा दर मिळाला. रुपयात हा दर ४ हजार ७०० रुपये होतो. मात्र या दरावर सोयाबीन जास्त काळ टिकलं नाही. नवीन वर्षाआधी बाजार बंद होताना म्हणजेच शुक्रवारी दर १५.२४ डॉलरवर पोहचला. रुपयात हा दर ४ हजार ६७० रुपये होतो. मागील सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर हा बाजार बंद झाला होता. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दारात क्विंटलमागे १२० रुपयांची सुधारणा झाली.

देशातील बाजार स्थिर

देशातील बाजारात सोयाबीन दर स्थिर होते. काही बाजारांमध्ये काहीसे चढ उतार पाहायला मिळाले. मात्र त्याचं प्रमाण खूपच कमी होतं. आठवड्याच्या शेवटी बाजार सुधारण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र बाजारावर काहीच परिणाम जाणवला नाही. आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत असूनही देशातील दरपातळी स्थिर होती. आठवडाभर देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर होते. आंतरराष्ट्रीय बाजार दर वाढले, मात्र देशातील बाजार स्थिर होता. त्यामुळं शेतकरी संभ्रमात होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button