बार्शी – फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट नऊ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

बार्शी — बार्शी तालुक्यातील पांगरी – शिराळा रस्त्यावर असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात असली तरी अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही मात्र या स्फोटात वीस ते पंचवीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
बार्शी तालुक्यातील पांगरी – शिराळा रस्त्यावरील फटाक्यांच्या कारखान्यात नववर्षाच्या दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की या स्फोटाचा आवाज जवळपास दहा किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या गावांमध्ये ऐकू गेला. या स्फोटात 9 जण मरण पावल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांनी ही माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाच हा स्फोट झाला. स्फोटावेळी कारखान्यात 40 कामगार काम करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांची टीमही दाखल झाली आहे. या स्फोटामुळे कारखान्याच्या दोन किलोमीटर परिसरातील शेतातील गवतही जळून गेले.