कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 18 गोवंशीय जनावरांना नेकनूर पोलिसांनी दिले जीवदान

बीड — कत्तलखान्याकडे घेऊन जात असलेल्या अठरा गोवंशीय जनावरांची सुटका नेकनूर पोलिसांनी केली. ही कारवाई पाटोदा – मांजरसुंबा मार्गावरील खंडाळा फाटा येथे शनिवार दि. 31 डिसेंबर रोजी केली.
जामखेड येथील आठवडी बाजारातून बीडच्या कत्तलखान्याकडे गोवंशीय जनावर घेऊन जाणार असल्याची खबर नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब कारवाई करत खंडाळा फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी टेम्पो क्र. एम एच 43 एचडी 4317 मधून डाटीवाटीने कोंबून 18 जनावरे घेऊन जात असल्याचं निदर्शनास आलं. यावेळी शफिक मोमीन इस्माईल वय 30 वर्ष, असद जाफर कुरेशी वय 18वर्ष, इलाईस सादिक कुरेशी वय 24 वर्ष तिघेही राहणार मोहम्मदिया कॉलनी बीड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. टेम्पोत तीन लाख 94 हजार रुपये किमतीची 18 गोवंशीय जनावरे आढळली. टेम्पो सह एकूण आठ लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अंमलदार बालासाहेब ढाकणे यांच्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनी विलास हजारे उपनिरीक्षक मनोहर अनवणे हवालदार दीपक खांडेकर अंमलदार बालासाहेब ढाकणे यांनी केली.नेकनूर पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणारी 18 जनावरे पकडल्यानंतर त्यांना चौसाळा येथील गो शाळेत पाठवून त्यांच्या चारा व पाण्याची सोय करून दिली.