नशा करून संसाराचा नाश करण्यापेक्षा भक्ती करून कुळाचा उध्दार करा श्रीहरी महाराजांचा भागवत कथेतून उपदेश

बीड — भारतभूमी ही संत,महंतांची, शुरवीरांची भूमी आहे. या भूमीमध्ये व्यसन करून संसाराचा नाश करून करण्यापेक्षा संताच्या विचारात राहून कळाचा उध्दार करा,प्रत्येक घरात एक तरी वारकरी असला पाहीजे, असे विचार भागवत कथाकार श्रीहरी महाराज रसाळ यांनी व्यक्त केले.
शहरातील ज्ञानेश्वर नगर आय.टी.आयच्या मागे येथे वाघीरकर परिवाराच्या वतीने कै. रत्नाकर वाघीरकर यांच्या स्मरणार्थ आयोजित संगीत भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. भागवत कथा ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असून नृसिंह आवतार, कृष्ण जन्म, याचे वर्णन महाराजांनी अतिशय सुंदर केले. प्रल्हादाचे वडील त्यांची क्रुरतेने वागले मात्र तरीही प्रल्हादाने वडीलांच्या उध्दाराचे वचन भगवान नृसिंहाकडून घेतले. तर कृष्ण जन्माच्या वेळी कथास्थळी प्रत्यक्ष गोकुळ आवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. भारतभूमीची महंती सांगताना या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा राय, यांच्या पासून ते संत भगवान बाबा, संत वामनभाऊ, चाकरवाडीचे संत ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत अनेक संतांनी जन्म घेवून ही भूमी पवित्र केली आहे. तर याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग,स्वा. सावरकर यांच्यासह अनेक शुरवीरांनी या भारतभूमीची शान वाढविली आहे. अशा भूमीमध्ये आपला जन्म झाला हे आपले भाग्यच आहे. मिळालेला जन्म सत्कर्मी लावावा असेही हरि महाराज यांनी सांगीतले. भागवत कथेसाठी मृदंगावर तुकाराम महाराज करांडे,मुक्ताराम करांडे, ज्ञानेश्वर नागरे यांची साथ लागत आहे. तर गायनाचार्य बबन महाराज काळकटे, ज्ञानेश्वर महाराज कांगणे, भिमराव भिलारे, नामदेव पाडुळे, लक्ष्मण केकाण जनार्धन तिळवणे आदींची साथ मिळत आहे. दि. ४ जानेवारी रोजी सप्ताहाची सांगता होत असून यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आशा वाघीरकर, अमित वाघीरकर, आशिष वाघीरकर यांच्यासह वाघीरकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.