महाराष्ट्र

निवडणूक आयोगाकडून रिमोट ईव्हीएम मशिन विकसित; मतदानासाठी गावी परतण्याची आता गरज नाही

नवी दिल्ली — व्यवसायामुळे इतरत्र स्थायिक झालेल्या मतदारांना मतदानकरण्यासाठी आपापल्या गावाकडे यावे लागते. लोकांचा हा त्रास कमी व्हावा, याकरिता रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनद्वारे मतदान घेता येऊ शकते का, याची चाचपणी करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

रिमोट मतदानाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी त्यात येणाऱ्या कायदेशीर आणि तांत्रिक अडथळ्यांवर आयोगाला सर्वप्रथम काम करावे लागणार आहे. मात्र रिमोट मतदानासाठीचे प्रात्याक्षिक मॉडेल आयोगाने तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील जवळपास एक तृतियांश लोक मतदान करीत नसल्याची बाब लक्षात घेऊन रिमोट मतदानाची संकल्पना विकसित केली जात आहे. नव्या स्वरुपाच्या या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा डेमो पाहण्यासाठी आयोगाने राजकीय पक्षांना निमंत्रित केले आहे.निवडणूक आयोगाने असे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन विकसित केले आहे की ज्या मशिनच्या माध्यमातून 72 मतदारसंघासाठी रिमोट मतदान करण्यासाठी व्यवस्था आहे. वर्ष 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 67.4 टक्के इतके मतदान झाले होते. याचा अर्थ त्यावेळी 30 कोटी लोकांनी मतदान केले नव्हते. विविध कारणांमुळे मतदानाची टक्केवारी घटत असते. त्यात कामा-धंद्यानिमित्त इतर ठिकाणी स्थायिक झालेल्या लोकांना मतदानासाठी आपल्या मूळ ठिकाणी परतता येत नसल्याचे प्रमुख कारण सामील आहे.देशातील किती लोक आपापल्या मूळ ठिकाणांहून कामा-धंद्यानिमित्त इतरत्र स्थायिक झाले आहेत, याचा अधिकृत आकडा सरकारकडे नसला तरी रिमोट वोटिंगमुळे अशा लोकांना मतदानाचा अधिकार बजावता येईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
काम-धंदा, शिक्षण, लग्न आदी कारणांमुळे लोक स्थलांतरित होत असतात. राज्याअंतर्गत होणारे स्थलांतरणाचे प्रमाण सुमारे 85 टक्के इतके आहे. रिमोट मतदानाचा डेमो येत्या 16 जानेवारी 2023 रोजी होणार असून निवडणूक आयोगाचे तांत्रिक तज्ज्ञ समितीचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत.
असे आहे रिमोट ईव्हीएम
भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी जवळजवळ एक तृतीयांश लोक मतदानाचा हक्क बजावत नाहीत. त्याला कारणेही अनेक आहेत. त्यातील एक म्हणजे स्थलांतरित कामगारांचे कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमी जाणे-येणे सुरु असते. यामुळे त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी मतदान करण्यासाठी जाणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) एक विशिष्ट प्रकारचे रिमोट इलेक्टॉनिक व्होटिंग मशिन विकसित केले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले की त्यांनी स्थानिक स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा एक नमुना विकसित केला आहे.निवडणूक आयोगाने एक मल्टी-कॉन्स्टिट्यून्सी EVM प्रोटोटाइप विकसित केले आहे ज्यामुळे दूरवर असणाऱ्यांना मतदान करता येणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आमंत्रित केले आहे. प्रोटोटाइप मल्टी-कॉन्स्टिट्यून्सी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (RVM) एकाच रिमोट मतदान केंद्रावरून अनेक मतदारसंघ हाताळू शकते. त्यामुळे स्थलांतरित मतदारांना मतदान करण्यासाठी त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्याची गरज नाही.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी 67.4टक्के होती आणि 30 कोटींहून अधिक मतदार त्यांच्या मताधिकाराचा वापर करत नसल्याची खंत निवडणूक आयोगाला आहे,” असे आयोगाने म्हटले आहे. ECI ने म्हटले आहे की मतदार त्यांचे रहिवाशी ठिकाण बदलल्यानंतर मतदार नोंदणी न करण्याची अनेक कारणे आहेत. त्यामुळे ते मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतात.देशांतर्गत होणारे स्थलांतर हे अनेकजण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याचे प्रमुख कारण आहे. त्यासाठी मतदानांच्या टक्केवारीत सुधारणा करण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग नोंदवण्याचा निवडणूक आयोगाचा (ECI) प्रयत्न आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button