वनविभागाला पोखरणारे तीन लाचखोर किडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

बीड — साॅ मील च्या मशीन चा परवाना नूतनीकरण करून कारवाई न करण्यासाठी पन्नास हजार रुपयाची लाच घेताना बीड वन विभागातील दोन वनरक्षक व चालकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
ही कारवाई जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.साॅमिल धारकाकडे वनविभागातील तिघांनी प्रत्येकी 5 हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरविले होते. सर्व साॅमिल धारकाकडून प्रत्येकी 2 हजार प्रमाणे 50 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष असलेल्या तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. पडताळणी नंतर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जालना येथील एसीबीच्या टीमने सापळा लावून कुर्ला रोडवरील एका साॅमिलच्या ठिकाणी या वनरक्षक जाधव, वनरक्षक शेख अकबर, चालक भालेराव या तिघांना 50 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. दरम्यान तक्रारदाराने तक्रार दिलेल्या पैकी एक कर्मचारी फरार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे बीडच्या वनविभागात खळबळ माजली आहे.