स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रस्ताव निकाली काढणार – कृषी मंत्री

नागपूर — स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील 7 एप्रिल ते 22 ऑगस्ट या कालावधीला कोणतीही विमा कंपनी नसल्याने खंडित कालावधी म्हणून घोषित करण्यात येत असून या कालावधीत प्रलंबित राहिलेले सर्व प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिली असल्याचे लेखी उत्तरात कृषिमंत्री अब्दुल सत्त्तार यांनी म्हटले आहे.
आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यात जून महिन्यानंतर बोजवारा उडालेल्या शेतकरी अपघात विम्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
या योजनेतून अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 2 लाख, दोन अवयव निकामी झाल्यास 2 लाख तसेच एक अवयव निकामी झाल्यास एक लाख इतकी मदत करण्यात येते. मात्र ही मदत तोकडी आहे, तसेच योजनेतील त्रुटी व प्रलंबित प्रस्तावांची संख्या खूप मोठी आहे. शिवाय ज्याच्या नावावर शेती नाही, अशा शेतकरी किंवा शेतमजुरास अर्ज करता येत नाही. यात सुधारणा करण्यात यावी, तसेच मदतीची रक्कमही किमान 5 लाख रुपये करावी, विम्या ऐवजी सानुग्रह अनुदान द्यावे, अशा स्वरूपाची मागणी करणारे तारांकित प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केले होते.
त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2022 या आर्थिक वर्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यास जून महिन्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, मात्र त्यानंतर सत्तांतर झाले व पुढे या योजनेसाठी कोणत्याही विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली नव्हती. धनंजय मुंडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधीनी मागणी केल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी शासनाने या योजनेसाठी विमा कंपनी नियुक्त केली, मात्र एप्रिल महिन्यापासून 22 ऑगस्ट पर्यंत प्रलंबित राहिलेल्या प्रस्तावांचा प्रश्न अनुत्तरित होता.
राज्य सरकारने धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने 28 नोव्हेबर रोजी 7 एप्रिल ते 22 ऑगस्ट या विमा कंपनी नियुक्त नसलेल्या खंडित कालावधीतील प्रस्ताव मान्य करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.
सदर योजनेत बदल करून अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देणे, मदतीची रक्कम वाढवणे यासह योजनेत अन्य सुधारणा करण्याचेही सरकारच्या विचाराधीन असल्याचे तारांकित प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.