गुटखा घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात होताच चालक फरार

केज — अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यास धडक दिली. अपघात होताच कारचा चालक गुटखा भरलेली कार जागीच सोडून पळून गेल्याची घटना धारूर केज रोडवरील साने गुरुजी विद्यालयाजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की, केज-धारूर रोडवरील साने गुरुजी विद्यालयाजवळ कार क्र. एम एच-12 न ब-3262 ने रस्त्याने पायी जात असलेल्या काशिनाथ राऊत वय 40 वर्ष यास धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्या नंतर ही कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली. अपघात होताच कार चालक कार सोडून पळून गेला.
या अपघाताची मिळताच पोलीस नाईक उमेश आघाव, पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी जखमी काशिनाथ राऊत पेंटर यास रुग्णालयात दाखल करत कारची तपासणी केली. यावेळी, कारमधून राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूची बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. कारमध्ये लाल रंगाचे रॉयल 220 तंबाखुचे 102 पुडे, केशरयुक्त हिरा का बाबाजी पान मसालाचे 102 पुडे असा एकूण 1 लाख 19 हजार 340 रुपयांच्या गुटख्याच्या 6 गोण्या व 2 लाख रुपये किंमतीची कार असा 3 लाख 25 हजार 970 रुपयांचा माल जप्त केला. जमादार उमेश आघाव यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत.