धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन

बीड — धनगर आरक्षण प्रश्नावर यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. 26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले
धनगर समाजाला विरोध करणाऱ्या खासदार हिना गावीत यांचा यावेळी निषेध करण्यात आला. विरोध करणारांना धडा शिकवण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक जण पारंपारिक वेशात सहभागी झाले होते. यावेळी गावित यांच्या फोटोला काळी शाई फासण्यात आली. यावेळी भारत सोन्नर म्हणाले की, संसदेत अधिवेशनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना खासदार गावीत यांनी धनगर आरक्षण नको, असे विधान केल्याचे माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे धनगर समाज खा. गावितांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज एसटी प्रवर्गाच्या सवलतीपासून वंचित आहे. या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करत आहे. भाजपाची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन बारामती येथे झालेल्या आंदोलनात दिले होते.धनगर समाजाचा विश्वासघात शिंदे – फडणवीस सरकार करत आहे. आता तरी तत्काळ धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच आरक्षण मिळेपर्यंत ज्या २२ योजना लागू करण्यात आलेल्या आहेत. त्या योजनांसाठी तत्काळ 5 हजार कोटींची भरीव तरतूद या अधिवेशनात करण्यात यावी. अन्यथा धनगर समाज जशाच तसे उत्तर देईल, असा इशारा भारत सोन्नर यांनी दिला. याप्रसंगी गणेश सातपुते, कैलास निर्मळ, रामनाथ यमगर, उमेश निर्मळ, साईनाथ कैतके आदी उपस्थित होते.