शिक्षणाधिकाऱ्यांचा तराफ्यावरून प्रवास करून विद्यार्थ्यांशी संवाद

शिंदेवस्तीचा रस्त्याचा प्रश्न; रस्ता अत्यावश्यक असल्याचा दिला जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल
बीड — पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायतअंतर्गत शिंदेवस्तीवरील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. रस्त्याअभावी नागरिकांसह विद्यार्थ्यांना तराफ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. याच तराफ्यावरून खुद्द प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांनी प्रवास करत विद्यार्थ्यांची भेट घेऊन संवाद साधला. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या निर्देशावरून अधिकाऱ्यांनी शनिवार दि. 24 डिसेंबर रोजी स्थळ पाहणी केली.
शिंदेवस्तीवरील विद्यार्थांवर थर्माकोलवरून शाळेत जीवघेणा प्रवास करण्याची वेळ येत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चप्पू चलाओ’ आंदोलन केले. या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून, खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांनी तराफ्यावरून प्रवास करत शिंदेवस्तीवरील विद्यार्थांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. दरम्यान, याठिकाणी रस्ता करणे अत्यावश्यक असल्याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे सादर केला आहे. तसेच, जिल्हा परिषद बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संयुक्त बैठकीद्वारे रस्त्याचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी श्री.कुलकर्णी यांनी आश्वासन दिले.
शिंदे वस्तीवरील रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. हा प्रश्न लवकर मार्गी लागेल. यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही न केल्यास ग्रामस्थांसोबत पुन्हा आंदोलन करू.
–डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, सामाजिक कार्यकर्ते, बीड