ताज्या घडामोडी

आ. सोनवणे यांच्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार धोक्यात ? कोश्यारींच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई — राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार टिकवण्यासाठी एक एक आमदार महत्त्वाचा असतानाच चोपडा मतदार संघाच्या आ. लताबाई चंद्रकांत सोनवणे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिरसा फायटर्सने सोनवणे यांची आमदारकी रद्द करावी यासाठी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

     जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या आ. लताबाई सोनवणे यांच्या जातप्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीकडून चौकशी सुरू आहे. त्यातच सोनवणेंची आमदारकी रद्द करावी यासाठी बिरसा फायटर्सने (द ट्रायबल ऑर्गनायझेशन) कंबर कसली आहे.या संघटनेने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यपाल सोनवणेंबाबत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. बिरसा फायटर्स या संघटनेच्या राज्यभरातील एकूण 522 पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोनवणे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी केली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे.लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आता नवीन सरकारच्या शिंदे गटाच्या आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लता सोनावणे या चोपडा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत त्यांना ७८ हजार १३७ मतं मिळाली. त्यांनी जगदीशचंद्र वळवी व चंद्रकांत बरेला यांना पराभूत केलं होतं.सोनवणे यांनी निवडणकू लढवताना खोटे जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले असल्याची तक्रार करण्यात आली आहे.हे प्रकरण सध्याजातप्रमाणपत्राची राष्ट्रीय न्यायाधिकरण समितीकडे आहे.आमदार सोनवणे यांचे “टोकरे कोळी” अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार जिल्हा यांनी 9 फेब्रुवारी, 2022 रोजी अवैध ठरवले होते. त्यानंतर सोनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर रीट याचिकेतून कमिटीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने 10 जून 2022 रोजी ही याचिका फेटाळून लावत प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button